मालक…का गेलात?

हाराष्ट्राच्या राजकारणातील संत, कर्मयोगी, रांजल्या गांजल्यांच्या हाकेला ओ देणारे माजी आमदार आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण झाल्याची मागील काही दिवसांपासून ऐकून होतो, त्यातच सोमवारी रात्री दहाच्या सुमारास माझा सहकारी नवनाथ पोरे याचा फोन आला, मोठ्या मालकांची तब्येत बिघडली असून, सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत, थोडी माहिती घेता का…हो म्हटले आणि एक-दोन फोनही लावले…रात्री उशिर झाल्याने पलीकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने परत नवनाथला फोन करुन ‘उद्या सकाळी मीच जातो सह्याद्री रुग्णालयात आणि मालकांची ख्यालीखुशाली कळवितो’ म्हणून निरोप दिला. मालक बरे असतील असे म्हणून झोपी गेलो, नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता व्हाट्सअप उघडले तर ‘पंत गेले’ म्हणून बातमी वाचली आणि धक्काच बसला, आणि जुन्या आठवणींत मन रमले.

St ला संजीवनी देणारा किमयागार ( व्हीडिओ पहा )


वास्तविक पाहता परिचारक गटाशी आमची नाळ कधी जुळलीच नाही. मला आठवतंय…लहानपणी अनिल नगरच्या गल्लीबोळात वावरत असताना मालकांबद्दल नेहमीच आकर्षण असायचे…धोतर, पांढरी टोपी आणि हातात काठी असा मालकांचा पेहराव…आमदारकीची निवडणूक असो देत किंवा नगरपालिकेची…प्रत्येक निवडणुकीत आम्ही परिचारक गटाच्या विरोधात क्रूरघोड्या करायचो…कालांतराने आमच्या वॉर्डातील राजकीय समीकरणे बदलली…मी त्यावेळी पंधरा ते सोळा वर्षांचा असेल नगरसेवक निवडणुकीसाठी एकाची शिफारस करायची होती. आम्ही गल्लीतील आम्ही चार टाळकी थेट वाड्यावर जावून पोहचलो…तर समोरच्या ओसरीवर मालक बसलेले होतेच…एकदम जोराच आवाज आला…’का आलता’…समोरचा आवाज ऐकून आमच्यातील एकाने सविस्तर वृत्तांत कथन केला…बघतो म्हणून मालकांनी शब्द दिला आणि संबंधीत इच्छुकाला उमेदवारी देवून तो पूर्णही केला…पुढे ‘पंढरी संचार’मध्ये काम करायला सुरूवात केल्यानंतर मालकांच्या अनेक आठवणी आदरणीय बाळासाहेब उर्फ बाबा बडवे यांच्याकडून एैकायला मिळत. कारण बाबा असे एकमेव व्यक्ती होते की ज्यांनी आपले निम्मे आयुष्य फक्त परिचारकमालकांशी निस्वार्थीपणाने मैत्री करण्यात घालविले होते. या दोघांच्या मैत्रीत तिसरे नाव होते लक्ष्मीनारायण भट्टड यांचे…या त्रिकूटाचे वर्णन मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या रुपात करेन….एका वृत्तपत्राचे मालक असल्यामुळे बाबा थोडेसे तत्वाशी बांधील होते. त्याची त्यांना किंमतही मोजावी लागली. दरम्यानच्या काळात बाबा आणि मालकांचे दुरावलेले संबंध हळूहळू रुळावर येत होते. याचा मला मनस्वी आनंद होता. झाले गेले चंद्रभागेला मिळाले म्हणत बाबा आणि मालक एकत्र आले होते. मालक बाबांकडे येवू लागले…या त्रिकूटांची जुनी मैफिल रंगणारे हे प्रत्यक्षात अनुभविण्यापूर्वीच मी नोकरीच्या निमित्ताने पंढरपूरचा निरोप घेतला…दरम्यानच्या कालावधीत पंढरपूरला दौरा असला की, पंत आणि बाबांची आपूसकच भेट होत असे. कुणाचे लग्न, मयत असो की निवडणुकांचे वातावरण या दरम्यान परिचारकमालक एकटेच हातात काठीचा आधार घेवून वाड्याबाहेर पडलेले असायचेच…कोणत्या ना कोणत्या चौकात मालकांची गाडी दिसयाची…सर्वात वयस्कर असूनही समोरच्याला आदराने नमस्कार घालत, धोतर सावरत मालक आपल्या पुढच्या दिशेने मार्गस्थ होत असायचे…परत भेटण्यासाठी…आता कोरोनामुळे मालकांची परत भेट होणार नाही…किंवा त्यांचे दर्शनही होणार नाही यामुळे अस्वस्थ असणारे मन सकाळपासूनच एक प्रश्न विचारत आहे….मालक का गेलात…

  • श्रीकांत रा. साबळे, पुणे
    मो. 8888085818

Leave a Reply

error: Content is protected !!