4 हजार नोकऱ्या गेल्या : देशातील आर्थिक संकटामुळे घेतला निर्णय
टीम : ईगल आय मीडिया
जगातील सुप्रसिद्ध आणि तब्बल 125 वर्ष जुन्या असलेल्या फोर्ड या वाहन उत्पादक कंपनीने भारतामधील आपले वाहन निर्मिती प्लॅन्ट बंद करण्याची घोषणा केली आहे. देशात कोरोना मुळे मोठा व्यावसायिक तोटा झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. लॉक डाऊनमुळे भारतीय बाजारपेठेत FORD कंपनीच्या वाहनांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कंपनीने भारतामधील चेन्नई आणि सानंद येथील आपले दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे 4000 भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर बेकारीचे संकट आले आहे.
भारतात चेन्नई आणि गुजरातच्या साणंद येथे फोर्ड कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत. याठिकाणी इकोस्पोर्ट, फिगो आणि एस्पायर या गाड्यांची निर्मिती केली जाते. या प्रकल्पांमध्ये फोर्डने तब्बल 2.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती.यापुढे कंपनी भारतात फक्त आयात केलेली वाहने विकणार आहे.
फोर्डच्या चेन्नई येथील मरायमलाई नगर आणि गुजरातमध्ये सानंद प्लांटमध्ये दरवर्षी सुमारे 40,000 युनिट्स उत्पादन क्षमता आहे. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे भारतात बहुतेक ऑटो उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारपेठ संकुचित झाली असून यामुळे कारखाने त्यांच्या एकूण क्षमतेपेक्षा कमी काम करीत आहेत. यातूनच फोर्ड कंपनी भारतात मोठे नुकसान सहन करत आहे.
त्यामुळे आता फोर्ड कंपनी आपल्या काही कार आयात करुन देशात विकत राहील. तसेच डिलर्सना विद्यमान ग्राहकांना सेवा देण्यासाठी देखील मदत करेल. फोर्ड ही जगातील सर्वात जुन्या वाहननिर्माता कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी दोन महायुद्धांची साक्षीदार राहिली आहे. तब्बल 125 वर्ष जुन्या असलेल्या या कंपनीची सूत्रे अजूनही फोर्ड परिवाराकडेच आहेत.