पॅकिंग मृतदेह : दिला दुसऱ्याच्या ताब्यात

सायन हॉस्पिटलमधील 2 डॉक्टर निलंबित

टीम : ईगल आय मीडिया

महापालिकेच्या सायन रूग्णालयात रस्ते अपघातातील जखमी शनिवारी रात्री मृत झालेल्या अंकुश सुरवडे ( वय २८ वर्ष ) या तरूणाचा मृतदेह रुग्णालयाने भलत्याच लोकांच्या ताब्यात दिल्याने मृतदेहांची अदलाबदल झाली. तसेच अंकुशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. यामुळे अंकुशच्या नातेवाईकांनी रुग्णालयात हंगामा केला असून रूग्णालयाच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, याप्रकरणी फॉरेन्सिक विभागातील दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे.

व्यवसायाने डान्सर असलेला अंकुश गौतम सुरवडे याचा दहा दिवसांपूर्वी वडाळा येथे पूर्व मुक्त मार्गावर अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना अंकुशचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्याचा मृतदेह घेण्यासाठी कुटुंबीय रुग्णालयात गेले असता त्यांना मृतदेह देण्यात आला नाही. मृतदेह दिला जात नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी तगादा लावला असता दुसऱ्याच रुग्णाच्या कुटूंबियांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

अंकुशच्या मृतदेहावर सायन येथील स्मशानभूमीत दुसऱ्याच रुग्णाच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले. मृतदेह पॅकिंग करून देण्यात आल्याने चेहरा न बघताच मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे दुसऱ्या रुग्णाच्या कुटुंबियांनी अंकुशच्या नातेवाईकांना सांगितले. या प्रकरणी अंकुशच्या नातेवाईकांना तसेच वडाळा विभागातील नागरिकांनी सायन रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गर्दी केली होती. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

Leave a Reply

error: Content is protected !!