नववर्षाचे असे स्वागत मुंबईने पाहिले नाही

31 डिसेंम्बर च्या रात्री मुंबईत जल्लोषा ऐवजी शुकशुकाट

टीम : ईगल आय मीडिया

मुंबई म्हणजे जल्लोष, मुंबई म्हणजे उत्साह आणि एनर्जेंटिक सिटी, मुंबईला जायचं म्हणजे मनसोक्त जगायचं, जीवाची मुंबई करायची , या पूर्वापार संकल्पनांना कोरोनाने तडा दिला. 31 डिसेंबर चा सरत्या वर्षाचा निरोप आणि नववर्षाचे स्वागत म्हणजे तर नुसता जल्लोष. मात्र यंदा अघटित अनुभव आला. असं नववर्ष स्वागत मुंबईने यापूर्वी पाहिले नाही.

देशात करोनामुळे नवीन वर्षाच्या जल्लोषाला यंदा मर्यादा होत्या. मुंबईत रात्रीची संचारबंदी असल्याने रात्री ११ वाजल्यानंतर सर्व प्रमुख ठिकाणांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.  महाराष्ट्रासह देशाने अखेर सरत्या वर्षाला निरोप दिला. सुरुवातीचे दोन महिने सोडले तर २०२० हे वर्ष करोना संकटाच्या छायेतच काढावं लागलं. हे संकट लवकर संपेल, अशी आशा बाळगून सगळे होते मात्र पदरी निराशाच पडली.

या संकटासोबतच आता नवीन वर्षात प्रवेश करावा लागत आहे. गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव व अन्य चौपाट्यांवर नववर्ष स्वागतासाठी थर्टी फर्स्टच्या रात्री मोठी गर्दी उसळत असते यंदा मात्र ही गर्दी पाहायला मिळाली नाही.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरसाठी गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या होत्या. त्यातच संचारबंदीही असल्याने रात्री ११ नंतर अनेकांनी घर गाठून घरीच नवीन वर्षाचे स्वागत केले. नव वर्ष स्वागताला फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली होती. त्याचेही नागरिकांनी पालन केले.

मुंबईतील नववर्ष स्वागत यंदा प्रथमच फटाकेमुक्त ठरलं. अनेक हॉटेल, पब, बारमध्ये न्यू ईयर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्यांना वेळेचे बंधन घालून देण्यात आलेले असल्याने रात्री साडेदहा वाजताच पार्टी आवरती घ्यावी लागली. दरवर्षी रात्रभर चालणारं सेलिब्रेशन यंदा करोनामुळे सर्वांनाच टाळावं लागलं. मुंबईप्रमाणे पुण्यातही प्रमुख ठिकाणी रात्री ११ नंतर शुकशुकाट पाहायला मिळाला.

Leave a Reply

error: Content is protected !!