कोरोना चाचण्यांसाठी आरटी-पीसीआर चाचण्या अधिक करा : देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई : ईगल आय मीडिया

कोरोना चाचण्यांची संख्या वाढवित असताना आरटी-पीसीआर चाचण्यांवरच अधिक भर द्यावा. उपलब्ध क्षमतेतून या चाचण्या केल्यास जनतेला आर्थिक भूर्दंड पडणार नाही आणि अधिक अचूक निदान होईल. अशाप्रकारच्या चाचण्यांची क्षमता असताना सुद्धा ती उपयोगात आणली जात नाही. त्याकडे लक्ष देण्याची विनंती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मुंबईचा अँटीजेन चाचण्यांचा अनुभव फारसा चांगला नाही. 18 ते 21 जुलै या काळात मुंबईत दोन प्रयोगशाळांचे अहवाल लक्षात घेता, लक्षणे असलेल्या सुमारे 65 टक्के रूग्णांची अँटीजेन चाचणी ही कोविड-19 साठी नकारात्मक आली होती, पण, त्यांची आरटी-पीसीआर चाचणी केली असता, ते कोरोना पॉझिटिव्ह आले. तामिळनाडूने असेच प्रारंभीच्या काळात अँटीजेन चाचण्यांवर भर दिल्या. त्यामुळे त्यांच्या चाचण्या वाढलेल्या दिसल्या. पण, नंतरच्या काळात त्यांनी केवळ आरटी-पीसीआर चाचण्यांवर भर देणे सुरू केले. अँटीजेन चाचण्यांमध्ये ‘फॉल्स निगेटिव्ह’ची संख्या भरपूर असल्याने त्यांना आपल्या टेस्टिंग योजनांमध्ये बदल करावा लागला होता.

अ.भा. आयुर्विज्ञान अनुसंधान संस्थानने राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रानुसार, महाराष्ट्रात आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता मोठी आहे. शासकीय प्रयोगशाळांमध्ये 35,900 तर खाजगी प्रयोगशाळांमध्ये 20,040 इतकी प्रतिदिन क्षमता आहे. एकूण चाचण्यांची क्षमता 55,940 इतकी आहे. यातील 12,210 इतकी क्षमता एकट्या मुंबईत उपलब्ध आहे. आतापर्यंतची मुंबईतील चाचण्यांची सरासरी पाहिली, तर ती साधारणत: 5800 चाचण्या इतकी आहे. प्रत्यक्षात 12,210 ही क्षमता असताना तुलनेत अतिशय कमी प्रमाणात ती वापरली जाते आहे. त्यामुळे नागरिकांना स्वत:च्या खिशातून चाचण्यांसाठी पैसे खर्च करावे लागत आहेत. स्थानिक प्रशासनाला सुद्धा पर्यायी चाचण्यांवर अतिरिक्त निधी खर्च करावा लागतो. आहे तीच क्षमता पूर्णपणे वापरल्यास नागरिकांना नाहक भूर्दंडही पडणार नाही, मोफत त्यांच्या चाचण्या होतील आणि त्या अधिक संख्येने अचूक होतील. त्यामुळे अँटीजेन चाचण्यांऐवजी आरटी-पीसीआरवरच अधिक भर द्यावा आणि तसे निर्देश संबंधितांना द्यावेत, तसेच मुंबईत केल्या जाणार्‍या अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या स्वतंत्रपणे दररोज जाहीर करण्यात यावी, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रातून केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!