देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : ईगल आय मीडिया
मुंबईत सातत्याने कमी होत असलेल्या चाचण्या, त्यामुळे संसर्ग शोधण्यात येत असलेल्या अडचणी, मृत्यूसंख्येची अद्याप होत नसलेली फेरपडताळणी, मृतदेहांची कोरोना चाचणी होत नसल्यामुळे कोरोना योद्ध्यांनाच मदतीपासून वंचित रहावे लागणे, याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, दि. 1 जुलै 2020 रोजी केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सर्व राज्यांना एक पत्र पाठवून मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याचा आग्रह धरला आहे. विविध राज्यांमध्ये असलेली चाचण्यांची क्षमता आणि त्याचा वापर होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबईत जून महिन्यात मुंबईत 1,32,245 चाचण्या झाल्या आहेत. सरासरी 4408 चाचण्या झाल्या आहेत. यातील पुन्हा होणार्या चाचण्यांची संख्या वजा केली तर 4000 चाचण्या दररोज होत आहेत. या 1,32,245 चाचण्यांपैकी 36,559 इतके रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. याचाच अर्थ मुंबईत संसर्गाचे प्रमाण हे 28 टक्के आहे. म्हणजे प्रत्येक 100 व्यक्तिंमागे 28 व्यक्तींना संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे. देशाच्या तुलनेत हा दर कितीतरी अधिक आहे. देशात 29 जूनपर्यंत 86,08,654 चाचण्या झाल्या होत्या आणि त्यात 5,49,946 रूग्णसंख्या होती. हा दर 6.39 टक्के आहे.
चाचण्या नियंत्रित केल्या जात असल्याकडे लक्ष वेधून ते या पत्रात म्हणतात की, नियंत्रित चाचण्यांमधून रूग्णसंख्या कमी-अधिक भलेही करता येईल. पण, संसर्ग वाढण्याचा धोका यापेक्षा अधिक मोठा आहे. मुंबईतील आतापर्यंतच्या एकूण 4556 मृत्यूंपैकी या एकट्या जून महिन्यात 3277 मृत्यू दर्शविण्यात आलेले आहेत. सांख्यिकी योग्य नसेल तर एकूणच प्रशासनाला कोरोनाविरूद्धची उपाययोजनांची दिशा आखणे अतिशय कठीण होऊन बसणार आहे. दररोज जवळजवळ 200 च्या आसपास मृत्यूसंख्या महाराष्ट्रात दाखविण्यात येते. त्यातील 60 ते 70 मृत्यू हे गेल्या 48 तासांतील दाखविण्यात येतात आणि 120 च्या आसपास हे त्या पूर्वीचे म्हणून दर्शविले जातात. मृत्यूसंख्येची फेरपडताळणीची प्रक्रिया ही लगेच पूर्ण केली पाहिजे, ही व्यवस्था झाल्याशिवाय कोविडविरूद्धची रणनीती आखणे अवघड होणार आहे. विशेषत: मुंबईतील रूग्णसंख्या या जून महिन्यात 94 टक्के, ठाण्यात 166 टक्के, कल्याण-डोंबिवलीत 469 टक्के, मिरा भाईंदरमध्ये 413 टक्के, भिवंडीत 1470 टक्के, पनवेलमध्ये 364 टक्के, नवी मुंबईत 190 टक्के इतकी वाढली असताना ही काळजी घेण्याची गरज अधोरेखित होते असेही फडणवीस या पत्रात म्हणतात.
मृतदेहांची चाचणी न करण्याचा फटका आता थेट कोरोनायोद्ध्यांनाच बसतो आहे. ऐरोलीत बंदोबस्तावर असणारे पोलिस मंगेश कांबळे यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांची कोरोना चाचणी करण्यास रूग्णालयाने नियमावर बोट ठेवत नकार दिला. त्यांच्या पत्नीला लक्षणे असल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली आणि त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या. आता त्यांची चाचणी न झाल्याने कोरोनामृत्यू म्हणून त्यांच्या कुटुंबीयांना मिळू शकणारी मदत मिळणार नाही. शिवाय, यामुळे नेमके किती कोरोनामृत्यू झाले, हेही कळू शकणार नाही. अधिक संख्येने चाचण्या हाच या संकट निवारणातील मुख्य आधार असल्याने त्याकडे तातडीने लक्ष द्यावे. राज्याची पूर्ण चाचणी क्षमता त्वरित वापरावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.