कोल्हापुरात कोरोनाचा कहर कायम : रुग्णसंख्या ३ हजार पार

बेड्स, व्हेंटिलेटरची कमतरता : उपचाराआभावी रुग्णांचे मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया
कोल्हापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढू लागली असून आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे काही रुग्ण बेड, व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. गुरुवारी जिल्ह्यतील कोरोना बाधितांची संख्या ३ हजारांवर गेली असून एका दिवसात ११ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. मृतांची संख्या ८५ वर पोहोचली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या जून अखेरपर्यंत नियंत्रणात होती, मात्र जुलै महिन्यात वेगाने कोरोना प्रसार सुरु झाला आहे. त्यामुळे टाळेबंदी जाहीर केली गेली. करोना रुग्णसंख्या टाळेबंदी लागू असतानाही वाढत असल्याचे दिसून येत आहे. नव्याने वाढलेल्या रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करताना प्रशासनाची कसरत होत आहे.


जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहेत. तर, गेल्या बारा तासांत आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ता ११०९ झाली आहे. एकूण २११३ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. करोना संसर्ग हा सामूहिक प्रसार होत असल्याने शहरासह जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हा रुग्णालय तसेच शहरातील खासगी रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत. नव्याने रुग्ण वाढल्याने त्यांची सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. सद्यस्थितीत ही सुविधा उपलब्ध करून देणे मुश्किल झाले आहे.


कोल्हापूर जवळ असलेल्या गांधीनगर येथील करोनाबाधित रुग्णाचे नातेवाईक बुधवारी रात्री रुग्णाला घेऊन जिल्हा रुग्णालयात आले पण बेड शिल्लक नसल्याने रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. रुग्णाला घेऊन नातेवाईकांनी गाव गाठले आणि गुरुवारी पहाटे उपचाराविना त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पर्यायी व्यवस्थेचा शोध सुरू केल्याचे सांगण्यात येते. कोल्हापुरात जिल्हा रुग्णालय , डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे व्हेंटिलेटर आवश्यक असणाऱ्या रुग्णांत वाढ होत आहे. जिल्हा रुग्णलयात व्हेंटिलेटर शिल्लक नसल्याचे आरोग्य विभागाकडून संबंधित रुग्णांना वा नातेवाईकांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येते.

Leave a Reply

error: Content is protected !!