टीम : ईगल आय मीडिया
गानसम्राज्ञी लता मंगेशकर राहत असलेल्या मुंबईतील पेडर रोडवरील प्रभुकुंज सोसायटीत करोना करोना विषाणूची शिरकाव झाला आहे. प्रभुकुंज सोसायटीत गेल्या आठवड्यात पाच करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून शनिवारी रात्री ही इमारात सील केली आहे.
लता मंगेशकर राहत असलेल्या प्रभुकुंज सोसायटीत करोनाचे पाच रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली. प्रभुकुंज सोसायटीत लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर वास्तव्यास आहेत. याशिवाय सोसायटीत काही वयस्कर रहिवासीदेखील राहतात. बीएमसीकडून ही संपूर्ण सोसायटी सॅनिटाइज करण्यात येणार आहे. त्याशिवाय सोसायटी परिसरात औषध फवारणीही केली जाणार आहे.
सोसायटी सील केल्याची बातमी समजताच लता मंगेशकर आणि कुटुंबीयांची विचारपूस करणारे फोन येउ लागले. त्यानंतर मंगेशकर कुटुंबियांनी याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली. यामध्ये त्यांनी लिहलेय, “आम्हाला आज संध्याकाळपासून प्रभुकुंज सोसायटी सील करण्याबाबत फोन येत आहेत. सोसायटीतील रहिवासी आणि महापालिका प्रशासनाने मिळून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला आहे. वयोवृद्ध रहिवाशांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड सतर्क राहणं गरजेचं आहे.”