पंढरपूरचे सुपुत्र पत्रकार श्रीकांत साबळे यांचा गौरव

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सन्मान : पत्रकारांना विमा कवच मिळण्यासाठी प्रयत्न करणार : ना. टोपे

पुणे : ईगल आय मीडिया

कोरोना साथीने थैमान घातलेले असताना आपल्या जीवाची पर्वा न करता सलग आठ महिन्यांपासून अधिक काळ रुग्णसेवेत झोकून देणार्‍या महाराष्ट्रातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि संपादक-पत्रकारांचा विशेष सन्मान आज (दि. 4 डिसेंबर 2020) आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंढरपूर चे सुपुत्र आणि दै. पुण्यनगरीच्या पुणे आवृत्तीचे संपादक श्रीकांत साबळे यांचा आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष, दै. पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, आमदार रोहित पवार, महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, लोहिया परिवार ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम लोहिया, अभय संचेती, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष किरण जोशी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुणेचे अध्यक्ष नितीन बिबवे व्यासपीठावर होते. कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालेल्या पत्रकारांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व या वेळी स्वीकारण्यात आले.

यावेळी बोलताना कोरोनाकाळात अचूक बातमी देणार्‍या पत्रकारांना विमा कवच मिळालेच पाहिजे यासाठी मीही आग्रही असून पत्रकारांसाठी सरकार दरबारी मी कायम वकिली करीत राहीन, अशी ग्वाही ना.टोपे यांनी दिली.

आ. रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात कोरोना काळात अनेकांनी लढा दिला. या कोरोना वॉरिअर्सना शोधून काढून त्यांचा सत्कार केला ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पत्रकारांनीही सकारात्मक बातम्या देऊन डॉक्टर, कर्मचारी तसेच या काळात मोलाचे योगदान देणार्‍या स्वयंसेवी संस्थांचे मनोधैर्य वाढविण्यास मदत केली. कोरोना काळात मृत्यू पावलेल्या 25 पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी 20 हजार रुपये देण्याची घोषणा केली.

कोरोना काळातील डॉक्टर, पोलीस, पत्रकार यांच्या कार्याचा गौरव करून डॉ. योगेश जाधव म्हणाले, राज्य शासनाने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाचे पालन केले तर आजार फैलण्यास नक्कीच आळा बसू शकेल. पत्रकरांना विमा कवच मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. एम. एस. भरतवाल, रुबी हॉलचे डॉ. परवेझ ग्रँट, औरंगाबाद येथील डॉ. अल्ताफ शेख, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. अशोक संचेती, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. केतन आपटे, डॉ. शरण नरुटे, मनपाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे, सोलापूर रेल्वे हॉस्पिटलचे डॉ. आनंद कांबळे, मुंबईच्या डॉ. सारिका पाटील, डॉ. जीत संगोई, डॉ. हनी सावला, सांगलीचे डॉ. विनोद परमशेट्टी, पिंपरी-चिंचवडचे डॉ. अनिकेत राठी, पुण्याचे डॉ. शिशिर जोशी, चिपळूणचे डॉ. विशाल पुजारी यांचा डॉक्टर विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सांगली महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, नायडू हॉस्पिटलच्या परिचारिका छाया जगताप, जयश्री किल्लेदार, केदार कासार, वैष्णवी राठी, जंगम कुटुंबिय, आरोग्य निरिक्षक सचिन पवार यांना रुग्णसेवा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.

सुनील कदम (पुढारी, कोल्हापूर), रोशनी शिंपी (दिव्य मराठी, औरंगाबाद), श्रीकांत साबळे (पुण्यनगरी, पुणे), समीर देशपांडे (लोकमत, कोल्हापूर), आनंद सुरवाडे (लोकमत, जळगाव) यांना संपादक/पत्रकार विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक संजय भोकरे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत डॉ. योगेश जाधव, संजय भोकरे, किरण जोशी, नितीन बिबवे, अजित घस्ते, अभिजित डुंगरवाल, सुजाता खानोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन बिबवे यांनी तर पंकज बिबवे यांनी आभार मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!