सोलापूर जिल्ह्यात लॉक डाऊन कालावधी ३१ ऑगस्ट पर्यंत
सोलापूर : ईगल आय मीडिया
मागील महिनाभरात दंड भरू भरून मेटाकुटीला आलेल्या दुचाकी स्वारांसह ३ चाकी आणि ४ चाकी वन चालकांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी नव्या आदेशात दिलासा दिला आहे. आजपासून दुचाकीवर डबलसीट तर तीन चाकी मधून १ अधिक २, चार चाकी मधून १ अधिक ३ लोकांना प्रवास करता येणार आहे. मात्र सर्वाना मास्क सक्तीचा तर दुचाकी वरील प्रवास्यांना मास्क आणि हेल्मेट सक्ती आहे. त्यामुळे आता सर्वाना बाहेर जायचे असेल तर हेल्मेट वापरावे लागणार आहे.
राज्य सरकारने राज्यातील लॉकडाउनची मुदत आता 31 ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ३१ जुलै रोजी नवीन आदेश काढून सोलापूर जिल्ह्यातही लॉक डाऊन ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवला आहे. त्याच बरोबर यापूर्वीच्या आदेशात सुधारणा करीत नागरिकांना प्रवास करण्यात सवलत जाहीर केली आहे . तसेच लग्न सोहळ्यासाठी ५० लोकांना, अंत्यसंस्कारासाठी २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडी ठेवण्याची वेळ कायम ठेवण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती सर्वाना केली आहे.
दरम्यान, सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी नव्याने आदेश काढत सोलापूर महानगरपालिका हद्दीत दुचाकीस्वारांना हेल्मेट आणि मास्क घालणे बंधनकारक करून डबलसीट प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. शहरातील मॉल्स्, मार्केट, कॉम्प्लेक्स तर फूडकोर्ट, रेस्टॉरंट यांचे किचन केवळ होम डिलिव्हरीसाठी 5 ऑगस्टपासून सुरु होईल, असेही त्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
बाह्य भागातील संघ नसेलेले क्रिडा प्रकारालाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यांना सुरक्षित अंतर पाळणे आणि सॅनिटायझिंगचे बंधन असणार आहे. तसेव केश कर्तनालये, स्पा, सलून, ब्युटी पार्लर पूर्वीप्रमाणे सुरु राहतील. त्यांना अटी व शर्थीचे पालन करणे बंधनकारक आहे. परवानगी देण्यात आलेल्या आस्थापनास केंद्र व राज्य सरकारच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल, असेही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.