चेस दी व्हायरस’ संकल्पना राज्यभर : मुख्यमंत्री ठाकरे


पिंपरी येथील कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण

पुणे : ईगल आय मीडिया

‘चेस दी व्हायरस’ संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे सांगतानाच ‘चेस दी वायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.
पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उप मुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण झाले. कार्यक्रमास महापौर उषा ढोरे, खा. श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे, खा. सुप्रियाताई सुळे, आ. माधुरीताई मिसाळ आदी मान्यवर या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.
” ‘चेस दी व्हायरस’ याप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, हीच संकल्पना आपण राज्यभरात राबविणार आहोत, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे, त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही, असे सांगतानाच कोरोनाचे निदान करण्यासाठी आवाजावरून चाचणी मुंबईत सुरू केली आहे, ही चाचणी यशस्वी झाली तर कोरोना निदानाच्या मोहिमेत आपण मोठा टप्पा गाठू शकू, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

अण्णासाहेब मगर स्टेडियम, पिंपरी येथे 816 खाटांचे स्वतंत्र कोवीड- 19 रुग्णालय उभारण्यात आले आहे. यामध्ये 616 ऑक्सिजन युक्त खाटा व 200 आयसीयू खाटांची सुविधा आहे. रुग्णालयामध्ये कोवीड -19 संबंधी अद्ययावत उपकरणे व सुविधा उपलब्ध आहेत. 3 हजार 900 चौरस मीटर आयसीयू निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित केले आहे. रुग्णालयाचे एकूण क्षेत्रफळ ११ हजार ८०० चौरस मीटर इतके आहे. 20 हजार चौरस मीटर जमिनीचे विकसन करण्यात येत असून या साठी 4 हजार किलो वॅट विद्युत पुरवठा देण्यात आला आहे. 25 हजार लिटर क्षमतेचे लिक्वीड ऑक्सिजन मेडिकल टॅंक आहेत.रुग्णालयाचे काम 6ऑगस्ट 2020 रोजी चालू झाले.आजच्या तारखेला 200 आयसीयू खाटा व 616 खाटा यांचे काम पूर्ण व टेस्टिंग चालू आहे.हे आयसीयू महाराष्ट्रातील निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे.


उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणाले, पुणे शहर व जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. या रुग्णालयामुळे कोविड रुग्णाला वेळेत उपचार मिळणे सुलभ होणार असून पुणे, पिंपरी – चिंचवड तसेच ग्रामीण भागातील रुग्णाला या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी या दोन्ही जम्बो रुग्णालयांची सेवा महत्त्वाची ठरणार आहे. निदान व उपचार वेळेत होतील याकडे विशेष लक्ष असून लवकरच राज्य कोरोनामुक्त होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्राने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. राज्यात कोरोना निदानासाठी सर्वाधिक चाचण्या पुणे जिल्हयात होत आहेत, त्यामुळे वेळेत निदान व वेळेत उपचार मिळत असून पुण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी जम्बो रुग्णालय महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रास्ताविक केले. तर
आभार सुहास दिवसे यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!