पुणे : ईगल आय मीडिया
पुण्यात गुरुवारी (दि 18 ) पती-पत्नीने आपल्या २ लहान बालकांसह तसेच वाकड परिसरात ३ जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे गुरुवारी १ जणाचा जीव वाचला, एका दिवसात ७ आत्महत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे येथील सुखसागर नगर येथे राहणाऱ्या अतुल दत्ता शिंदे ( वय ३३ वर्षे ) त्याची पत्नी जया अतुल शिंदे ( वय ३२ ) मुलगा ऋग्वेद ( वय ६ वर्षे ) मुलगी अंतरा ( वय ३ वर्षे ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. मयत दत्ता आणि जया यांनी २०१३ साली प्रेमविवाह केला होता आणि वाघजाईनगर येथील सुखसागर सोसायटी येथे राहत होते. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडल्याचा अंदाज असला तरी शुक्रवारी सकाळी हा प्रकार समोर आला. भारती विद्यापीठ पोलीसानी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
दरम्यान, गुरुवारी वाकड परिसरातील प्रशांत नरेंद्र शेठ या ३२ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने कॅप्रिसियो सोसायटीतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची पत्नी आणि मुलगा घरात असतानाच गुरुवारी दुपारी प्रशांतने आत्महत्या केली. हिंजवडी एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करीत असलेला प्रशांत सेठ हा मूळचा इंदूर ( मध्य प्रदेश ) येथील आहे. आपल्या मृत्यूस कुणालाही जबाबदार धरू नये अशा स्वरूपाची चिट्ठी पोलिसांना घटनास्थळी सापडली आहे.
शिवाजीनगर येथील डल्व्हेरा सोसायटीच्या ८ व्या मजल्यावरून उडी मारून कणिका नरेंद्रकुमार शर्मा या ३३ वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. हि महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती आणि तिला अडीच वर्षे वयाचा मुलगा आहे. गुरुवारी दुपारी तिने ८ व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरानी मृत घोषित केले.
रोहातनी येथील निसर्ग कॉलनीत राहणाऱ्या गेनदेव बाबुराव काशीद ( वय ४० ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. केबल ऑपरेटर म्हणून काम करीत असलेल्या गेनदेव ची पत्नी माहेरी गेली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
आत्महत्या करीत असल्याचा कंट्रोल रूमला फोन आणि पोलीस पोहोचले घरी
दरम्यान, रोहटनी येथील गजानन कॉलनीतून पोलीस कंट्रोल रूमला सायंकाळी ६ वाजता, ” मी आत्महत्या करीत असल्याचा फोन आला होता. आपली पत्नी मुलांसह तिच्या आईकडे राहण्यास गेली आहे आणि ती परत येत नाही, त्यांच्याशिवाय आपण एकटे राहू शकत नाही “
माहिती मिळताच बिटचे पोलीस नाईक बुरकुले आणि पो. कॉ. जावेद शेख तातडीने संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर पोहोचले, पोलीस उपनिरीक्षक मुडल आणि इतर पोलिसांनी त्या इसमाची समजूत काढली, त्याच्या पत्नीसोबत फोनवर बोलणे केले. पत्नीने परत येण्याचे कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्या इसमास त्याच्या भावाकडे सोडले. वेळीच माहिती मिळाली आणि पोलिस घटनास्थळी पोहोचल्यामुळे आणखी एक आत्महत्या होता – होता वाचली आहे. याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.