पुण्यात 448 दुकाने जळून खाक

पुणे : ईगल आय मीडिया

पुणे शहरातील लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्त्यालगतच्या प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट येथे शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. कँटोन्मेंट अग्निशमन केंद्र आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 448 दुकाने जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, जवळपास अडीच तासांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश मिळाले असून सध्या कूलिंगचे काम सुरू असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

फॅशन स्ट्रीटवर लागलेल्या आगीची तीव्रता मोठी असून या दुर्घटनेत मार्केटचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन विभागाने पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागासोबत फॅशन स्ट्रीटचे फायर ऑडिट केले होते. त्यामध्ये फॅशन स्ट्रीटला आग लागण्याची भीती वर्तविण्यात आली होती. बोर्डाच्या अध्यक्षांनी काही महिन्यांपूर्वी फॅशन स्ट्रीटची पाहणी करत नव्याने फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

लष्कर परिसरात आग लागण्याची दहा दिवसांतील ही दुसरी घटना असून, आठवडाभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज मार्केटलाही भीषण आग लागली होती. त्यामध्ये मार्केटमधील चिकन व मासळी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ फॅशन स्ट्रीट बाजारपेठही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने, तेथील व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!