आजवर ६ हजार मृत्यू : २४ स्मशान भूमी कमी पडू लागल्या
पुणे : ईगल आय मीडिया
पुण्यात आतापर्यंत 6 हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील सर्वच्या सर्व 21 स्मशानभूमींवर लोड आला आहे, असं येथील कैलास स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने सांगितलं. पुण्यातील 24 स्मशानभूमींमध्ये येणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढत आहे. कोरोना बळींचा आकडा वाढत असल्याने पुण्यातील सर्वच स्मशानभूमी फुल झाल्या आहेत. स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच नसल्याने मोकळ्या मैदानात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
रोजच मोठ्या प्रमाणावर मृतदेह स्मशानभूमीत येत आहेत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नसल्याने मोकळ्या मैदानात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पुणे पालिकेने घेतला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या कुटुंबीयांना तास न् तास ताटकळत राहावं लागणार नाही. त्यामुळे विद्यूत दाहिनींमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याच्याही घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यात अकराहून अधिक गॅस आणि विद्यूत दाहिंनींमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना तास न् तास वाट पाहावी लागली होती.
पुण्यात दिवसाला शंभर लोकांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. त्याशिवाय 120 हून अधिक मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमीत येत आहेत. रस्ते अपघात, नैसर्गिक मृत्यू आणि इतर आजारांमुळे होणारे हे मृत्यू आहेत, अशी माहिती पालिकेचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंडूल यांनी सांगितलं.
पुणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट मोठी विध्वंसक ठरत आहे. येथे रुग्ण वाढत असल्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. राज्य सरकारने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात बाधितांचा आकडा 796645 वर पोहोचला आहे. तर येथे आतापर्यंत एकूण 680067 जण कोरोनामुक्त झालेयत. पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे 9020 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 107503 सक्रिय रुग्ण आहेत. तर दुसरीकडे राज्यात रविवारी 66191 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसेच दिवसभरात तब्बल 832 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. तर काल 61,450 जण कोरोनोमुक्त झाले.
पुण्यातील 21 स्मशानभूमीत सलग अंत्यसंस्कार होत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीतील लोखंडाच्या सळ्याही पिघळण्यास सुरुवात झाली आहे. स्मशानभूमीतील चिमण्याही खराब होत आहेत. त्याशिवाय ओव्हर हिटिंगही सुरू आहे. स्मशानभूमीत कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून अभियंत्यांची एक टीम तैनात करण्यात आली आहे. तसेच चार अतिरिक्त विद्यूत दाहिन्या बनविण्यासाठी 240 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. स्मशानभूमीत सलग अंत्यसंस्कार होत असल्याने अखेर निर्जन आणि मोकळ्या जागांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.