उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील ‘कोरोना’ व्यवस्थापनाचा आढावा
पुणे : ईगल आय मीडिया
पुणे, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात ‘कोरोना’ रुग्णदर व मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा सूचना देवून ‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील ‘कोविड व्यवस्थापन व नियोजना’बाबत बैठक झाली.
बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ‘आयसर’चे अर्नब घोष व डॉ. आरती नगरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर,आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, ससूनचे प्रभारी अधीष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देऊन काम करावे. तसेच कोरोनाबरोबरच पावसाळयातील अन्य संसर्गाचे आजार व सारी आजाराच्या रुग्णांवर वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी असेही आदेश अजित पवार यांनी दिले.
यावर्षी कोरोनाची महामारी असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरातल्या गणपतींचे घरातच तर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन देखील साधेपणाने करणे गरजेचे आहे. यासाठी कोणीही सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करु नये. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मानाचे गणपती व अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही, याची पोलीस विभागाने दक्षता घेण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.