अजितदादांच्या समक्ष फडणवीसांचे राज्य सरकारला चिमटे

पुण्यात कोविड हॉस्पिटल उदघाटन प्रसंगी केली टीका

पुणे : ईगल आय मीडिया

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते म्हणून जाहीर टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या समक्षच राज्य सरकारला कोरोना साथीच्या निमित्ताने जाहीर चिमटे काढले. विशेष म्हणजे यावेळी अजित पवार यांनी ऐकून घेण्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आहेत.

बालेवाडी, पुणे येथे शुक्रवारी पुणे महापालिकेच्या नवीन कोविड सेंटरचे उदघाटन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि अन्य यावेळी उपस्थित होते.

एकत्र आले तर त्यात गैर काय ?

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना एकत्र आलो तर त्यात गैर काय असा सवाल उपस्थित केला. एकत्र येणार, एकत्र येणार अशी चर्चा होतेय, संकट काळात विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आले तर त्यात गैर काय ? असे अजितदादा यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की,
महाराष्ट्रात दररोज सुमारे 15 हजाराच्या आसपास कोरोना रूग्ण आढळून येत आहेत.
संसर्गाचा दर आयसीएमआरने 5 टक्के इतका नियंत्रणात ठेवण्यास सांगितले आहे. पण, राज्यात तो 20 टक्के आहे.
देशातील मृत्यूंपैकी 40 टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात आहेत
महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक आहे.

राज्यात चाचण्यांवर अजूनही आपण हवे तसे लक्ष केंद्रीत केलेले नाही. चाचण्या करताना मुख्य भर हा आरटी-पीसीआर चाचण्यांवर द्यायला हवा, पण, तो दिला जात नाही. अशीही टीका फडणवीस यांनी केली.

नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी भाजप सोबत हात मिळवणी केली होती. त्यानंतर जरी पवार-फडणवीस युतीचे गणित जमले नसले तरीही दोन्ही नेत्यांचे सख्य लपून राहिलेले नाही. त्यातच अजित दादांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी वेगळी भूमिका घेत अप्रत्यक्ष राज्य सरकारला लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर पवार – फडणवीस यांची पुण्यातील स्टेज शेअरिंगची बातमी आणि फडणवीसांनी काढलेले चिमटे चर्चेत आले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!