2 लाख 17 हजारांवर रुग्ण संख्या : मृत्यू दरही वाढला
मुंबई : ईगल आय मीडिया
राज्यात गेल्या २४ तासांत करोना संसर्गामुळे आणखी २२४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा ९ हजार २५० इतका झाला आहे. राज्यात आज ५ हजार १३४ नवीन रुग्णांची भर पडली असून दिलासा देणारी बाब म्हणजे ३ हजार २९६ रुग्ण करोनावर मात करून आज घरी परतले आहेत. ( Coronavirus In Maharashtra )
देशात महाराष्ट्रामध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण थोडे थोडे वाढत असले तरी अन्य आकडे चिंता वाढवणारे आहेत. राज्यात सध्या करोना मृत्यूदर ४.२६ टक्के इतका असून गेल्या २४ तासांत करोनाने २२४ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात आज ५१३४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख १७ हजार १२१ इतकी झाली आहे. आतापर्यंत राज्यात ११ लाख ६१ हजार ३११ इतक्या करोना चाचणी झाल्या असून त्यातील १८ टक्के रुग्ण करोना पॉझिटिव्ह निघाले तर बाकी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
राज्यातील करोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) किंचित वाढले आहे. आज हे प्रमाणा ५४.६ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ३ हजार २९६ रुग्ण करोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण १ लाख १८ हजार ५५८ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यात सध्या ६ लाख ३१ हजार ९८५ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४५ हजार ४६३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.