भीमा नदीतून भर दिवसा चालतो वाळू उपसा आणि होड्यातून वाहतूक

महसूल प्रशासनाचा मात्र कारवाईचा देखावा

पंढरपूर : eagle eye news

तालुक्यातील भीमा नदीतून दिवस – रात्र चोरटी वाळू तस्करी सुरूच आहे. दर आठ – पंधरा दिवसानी महसूल विभागाच्यावतीने कारवाई केल्याचा देखावा केला जात आहे. मात्र त्यानंतर पुन्हा वाळू तस्करांची मात्र सुगी सुरू असल्याचे दिसत आहे.

पंढरपूर तालुक्यात भीमा नदीतून सद्या मोठ्या प्रमाणात वाळू चोरी चालत आहे. पंढरपूर शहराच्या आसपास असलेल्या शिरढोण, गुरसाळे, चिंचोली भोसे, इसबावी, भटुंबरे, शेगाव दुमाला या परिसरातून दिवस – रात्र तर चंद्रभागा नदीतून रात्री गाढवाच्या मदतीने वाळू उपसा केला जात आहे. भीमा नदीतून भर दिवस अगदी दुपारी अकरा आणि बारा वाजतासुद्धा राजरोसपणे होडीच्या माध्यमातून पाण्यातून वाळू काढली जात आहे. रस्त्याने ये – जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना भीमा नदीतून चालणारी ही चोरटी वाळू वाहतूक दिसते.


भीमा नदीतून चालणाऱ्या वाळू चोरीला आळा घालण्यासाठी महसूल मार्फत सतत कारवाया केल्या जात आहेत. आजवर ९० ते ९५ होड्या फोडून नष्ट केल्या आहेत, काही वाहने जप्त केलेली आहेत, लाखो रुपयांचे दंड हि केलेले आहेत. मात्र शनिवार, रविवार असे सुट्टीचे दिवस असले कि वाळू चोर अधिक सक्रिय होतात असे अनुभव आहेत. नदीच्या पाण्यात स्पीड बोट घेऊन कारवाईला गेले तरी आरोपी पाण्यात उद्या टाकून होड्या सोडून पळून जातात. यापुढे पोलीसांच्या मदतीने आणि पथके बनवून कारवाई करण्यात येईल.

सुशील बेल्हेकर , तहसीलदार, पंढरपूर

वाळू वाहतूक बंद करण्यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी पंढरपूर दौऱ्यात महसूल विभागाला वाळू तस्करी रोखण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत तरीही वाळू वाहतूक थांबलेली नाही. ग्रामीण भागातून जेसीबी व टिपरचे सहय्याने तर पंढरपूरच्या जवळपास असणाऱ्या गावातून होडीतून आणि चंद्रभागेच्या वाळवंटातून गाढवांच्या, मोटारसायकलच्या सहाय्याने दिवस रात्र वाळू उपसा चालू असतो.

या वाळू तस्कर आणि वाहतूकीबाबत माध्यमातून बातम्या आल्या की काही वाहन, आणि चार दोन होड्यांवर कारवाई केली जाते. मात्र चार दोन दिवसानंतर पुन्हा जैसे थे या पद्धतीने वाळू तस्कर कामाला लागतात व दिवस रात्र भीमेची लूट चालू करतात असे दिसून येते.

चोरट्या वाळूचा आठ हजार रुपये ब्रास

कायदेशीर मार्गाने बांधकामास वाळू मिळत नसल्यामुळे वाळू तस्करी जोमात आहे, त्यामुळे वाळूला चक्क सोन्याचा भाव आलेला आहे. आठ हजार रुपये ब्रास किंवा चार ब्रास वाळूचा टिपर 32 ते 35 हजार रुपयांना विकला जात आहे. अलीकडच्या काही दिवसांत दगडी क्रश वाळू, किंवा डस्ट मिळणे कमी झाल्यामुळे बांधकाम करणाऱ्यांना वाळू शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे मागच्या दोन-तीन महिन्यात चोरट्या वाळूचे दर पुन्हा 35 हजार रुपये टिपरपर्यंत वाढलेले आहेत. यातील शासनाला एक रुपयाही न मिळता दररोज शेकडो ब्रास वाळू चोरीची एवढी मोठी वसुली कोणाच्या खिशात जाते हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!