आरोपीस ३ दिवसांची पोलीस कोठडी
पंढरपूर : eagle eye news
अभिमान मेटकरी खून प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीसानी बारा तासात एका आरोपीस अटक केली असून दुसरा आरोपी पसार झालेला आहे. चौकशी दरम्यान आरोपींनी केवळ वीस हजार रुपयांसाठी अभिमान मेटकरी यांचा खून केल्याचे समोर येत आहे. मंगळवारी पोलिसांनी आरोपीस न्यायालयासमोर उभा केले असता तीन दिवसाचे पोलीस कोठडी सुनावली आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, अनवली ( ता. पंढरपूर ) येथील अभिमान मेटकरी ( वय वर्षे 55 ) यांचा मृतदेह रांजणी ( ता. पंढरपूर ) येथील वनक्षेत्रात सोमवारी सापडला होता. यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात अभिमानी मेटकरी यांचा मुलगा दिगंबर मेटकरी याने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तालुका पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला आणि अवघ्या बारा तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नितीन दत्तात्रय माळी व सौरभ बनकर ( दोघेही रा.अनवली ) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपी पैकी नितीन दत्तात्रय माळी यांस पोलिसांनी अटक केली असून सौरभ बनकर फरार आहे.
मयत अभिमान मेटकरी यांच्याकडून नितीन माळी याने काही महिन्यापूर्वी वीस हजार रुपये हात उसने घेतले होते. ते पैसे परत दे, अशी मागणी अभिमान मेटकरी करीत होते. तसेच याच संदर्भात नितीन माळी याला त्यांनी शिवी दिली होती. शिवी दिल्याचा आणि पैसे देणे होत नसल्याचा राग मनात धरून नितीन माळी व त्याचा साथीदार सौरभ बनकर यांनी अभिमान मेटकरी यांना रविवार ( दि. १६ ) रात्री मोटरसायकलवर बसवून दारू पिण्यासाठी चला, असे म्हणून नेले. रांजणी गावची हद्दीतील वनविभागाच्या जंगलात नेऊन सोबत आणलेले लोखंडी चौकोनी पाईप डोक्यात मारून अभिमान मेटकरी यांचा खून केला.
तसेच मयताच्या हातातील सोन्याच्या पाच अंगठ्या, खिशातील मोबाईल व रोख रक्कम काढून घेतली. आरोपींनी मयताचा मोबाईल भीमा नदीत टाकला व गुन्ह्यासाठी वापरलेली लोखंडी हत्यारे श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील रस्त्यालगत झुडपात फेकून दिली.
यासंदर्भात पोलिसांनी आरोपींना सोमवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. तर आरोपी दुसरा आरोपी सौरभ बनकर हा प्रसार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी आरोपी नितीन माळी यास अटक करून न्यायालयासमोर उभा केले होते. या संदर्भात अधिक तपास करण्यासाठी सात दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.