आरोपीस जन्मठेपेची शिक्षा : 50 हजारांचा दंड
पंढरपूर : ईगल आय मीडिया
शेत जमिनीच्या बांधाचा दगड हलवल्यामुळे डोक्यात टाॅमी मारून दिलीप साहेबलाल नदाफ (रा. बालाजी नगर तांडा तालुका मंगळवेढा) यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी सैफन बंडू नदाफ यास जन्मठेपेसह 50000 दंडाची शिक्षा पंढरपूरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन के मोरे यांनी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी बिस्मिल्ला नदाफ व आरोपी सैपन नदाफ यांच्या शेतजमिनी जवळजवळ आहेत. या शेत जमिनीच्या बांधावरून वाद होऊन आरोपी बंडू याने शेतजमिनीच्या बांधाचा दगड हलवला होता. तो दगड गुलाब नदाफ याने परत आहे तसा ठेवला होता.
या कारणावरून 26 नोव्हेंबर 2015 रोजी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पुन्हा 27 नोव्हेंबर रोजी आरोपी सैपन नदाफ याने दिलीप साहेबलाल नदाफ यास मरवडे गावाच्या शिवारात सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास लोखंडी टाॅमीने मारून गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेने मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास अधिकारी ए.आर. डाके यांनी तपास करून तीन आरोपी विरोधात पंढरपूर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणी दरम्यान सरकार पक्षाने पंधरा साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून आरोपीने गुन्हा केल्याचे सबळ पुरावे न्यायालयासमोर आणले. त्यानुसार आरोपी यास कलम 302 मध्ये दोषी धरून जन्मठेपेसह 50000 दंडाची शिक्षा सुनावली.
यापैकी चाळीस हजार रुपये फिर्यादीस नुकसान भरपाई देण्याचा देखील निकाल न्यायालयाने दिला आहे. तर या गुन्ह्यातील संशयित आरोपी बंडू नदाफ व हाफिजा नदाफ यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. यात सरकार तर्फे अॅड सारंग वांगीकर यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल रमेश सूर्यवंशी कार्यरत होते