अपघाताचा बनाव : बायकोनं काढला नवऱ्याचा काटा

प्रियकराचा त्यात निम्मा वाटा : 5 दिवसांची पोलीस कोठडी

मोहोळ : ईगल आय मीडिया

अपघाताचा बनाव करून अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पतीचा काटा काढल्याची घटना मंगळवार ३० मार्च रोजी उघडकीस आली. या प्रकरणी मोहोळ पोलिसात पत्नी व तिच्या प्रियकरा वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा बसवेश्वर वाघचवरे ( वय २६ वर्षे ) दादासाहेब दिलीप करंडे ( वय २६ वर्षे , दोघे रा. सारोळे ता. मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मोहोळ न्यायालयाने आरोपींना ५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. २२ मार्च रोजी या विवाहितेने प्रियकराच्या मदतीने पतीचा अपघात घडवून आणला होता.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मोडनिंब येथे सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणी सारोळे येथील बसवेश्वर महादेव वाघचवरे हा जेसीबी चालक तर मारुती एकनाथ करंडे हा ट्रॅक्टरचालक म्हणून काम करत होते. २२ मार्च रोजी बसवेश्वर वाघचवरे आणि मारुती करंडे हे दोघे दुचाकी ( क्र. एम.एच. १३, सी.ए. ८६४५ ) मोडनिंबहून मोहोळच्या दिशेने निघाले होते. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांची दुचाकी देवडी गावच्या शिवारात कचरे पेट्रोल पंपासमोर आली असता, पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालट्रक (क्र एम.एच. १२ आर.एन. १६९१) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले, ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने बसवेश्वर वाघचवरे हा जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक जागेवर सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

मृत बसवेश्वर महादेव वाघचवरे यास एका प्रकरणात यापुर्वीच सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तुरुंग प्रशासनाने त्यास पॅरोलवर सोडले होते. तुरुंगप्रशासना कडून त्यास हजर राहण्याबाबत पत्र देखील आले होते. मात्र एक दिवस आधीच त्याचा घात झाला. त्यामुळे तुरुंगात हजर झाला असता तर किमान प्राण तरी वाचले असते अशी चर्चा सारोळे परिसरात सुरू होती.

या अपघाताची मोहोळ पोलिसात नोंद झाली होती. तपास करणाऱ्या हेड कॉन्स्टेबल शिंदे यांना ट्रकचालकाचे नाव दादासाहेब दिलीप करंडे (रा. सारोळे) असल्याचे समजले. या प्रकरणात घातपाताचा संशय वाटल्याने त्यांनी सर्व बाबी पोलिस निरीक्षक सायकर यांच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश बोधले यांच्या पथकाने या अपघातातील जेसीबी चालक तसेच ट्रक चालक दादासाहेब दिलीप करंडे याच्या बाबत अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

त्यामुळे पोलिसांनी जेसीबी चालक बसवेश्वर वाघचवरे याची पत्नी रेखा बसवेश्वर वाघचवरे तिच्या बद्दलची माहिती गोळा केली असता, तिचे आणि अपघात करणाऱ्या दादासाहेब करंडे यांचे प्रेम प्रकरण उजेडात आले. या दोघांनी संगनमत करून बसवेश्वर वाघचवरे याच्या दुचाकीला धडक देऊन ट्रक अंगावर घालून त्याला ठार मारले. तर दुचाकीवरील मारुती करंडे यालादेखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने तो वाचला. याप्रकरणी मोहोळ पोलिसात वरील दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून मोहोळ पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खापरे हे करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!