टीम : ईगल आय मीडिया
शहरातुन वाळूची वाहतूक करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना औरंगाबाद शहराच्या तहसीलदाराला सोमवारी रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास करण्यात आली. डॉ. किशोर देशमुख असे तहसीलदाराचे नाव असून या कारवाईमुळे औरंगाबाद महसूल मध्ये खळबळ उडाली आहे.
काल सोमवार (दि.22) रात्री सुमारे 11.30 वाजता तहसीलदार देशमुख यांनी तक्रारदाराला पैसे घेऊन बोलावले होते. ठरल्याप्रमाणे दीड लाख रुपयांची रक्कम घेऊन तक्रारदार हा देशमुख यांच्याकडे गेला. त्यानंतर ही रक्कम स्वीकारतांना देशमुख यांना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे निकाळजे आणि त्यांच्या पथकाने रंगे हाथ पकडले.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहर महसूल परिसराच्या हद्दीत वाळूची वाहतूक करायची असल्यास प्रति महिना दीड लाख रुपये हप्ता देण्याची मागणी तक्रारदाराकडे तहसीलदार देशमुख यांनी केली होती.
ही रक्कम दिली नाही, तर मग ठेकेदाराच्या वाहनांवर कारवाई करणार, अशी धमकी देखील देण्यात आली होती. या धमकीनंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच संबंधित पथकाने लाच मागणीची शहनिशा केली. त्यानंतर तहसीलदार डॉ. कशोर देशमुख यांना रंगेहाथ पकडण्याची सापळा रचला गेला आणि देशमुख रंगेहाथ सापडले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.