पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला : आंदोलकांनी लोकल रेल्वे बंद पडली : पोलीस अधिकाऱ्याची बदली : शाळेचे मुख्याध्यापक निलंबित
टीम : ईगल आय न्यूज
बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संतप्त हजारो पालक रस्त्यावर उतरले आहेत. लोकल रेल्वे बंद पडली आहे. दरम्यान या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत, मनसेचे प्रवक्ते अविनाश जाधव यांनी गृहमंत्री मनसेचा असता तर आरोपीचे एन्काऊंटर केले असते अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे. सर्वत्र संतापाची लाट उसळली असताना अखेर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणी आरोपी अटकेत असला तरी या संपूर्ण घटनेत पोलीस प्रशासनाने जो बेजबाबदारपणा दाखवला. त्याप्रकरणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची नेआण करण्याची जबाबदारी असणाऱ्या सेविकांचे निलंबन केले आहे. आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तो कंत्राटदारामार्फत शाळेत सफाईचे काम करत होता.
बदलापूरच्या आदर्श महाविद्यालयात सफाईचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराच्या एका कर्मचाऱ्यांनी शिशुवर्गात शिकणाऱ्या एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. त्यासोबत दुसऱ्या एका चिमुकलीसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची बाब देखील समोर आली. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण बदलापूर हादरले होते.
या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्यांची तातडीने हकालपट्टी करण्यासोबतच ज्या खाजगी कंत्राटदाराच्या माध्यमातून हा कर्मचारी कंत्राटी पद्धतीने शाळेत काम करत होता, त्या कंत्राटदार कंपनीचा करार रद्द करून काळ्या यादी टाकण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणात शाळेतील सीसीटीव्ही तपासण्याची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिकांना निलंबित करण्यात आलं असून ज्या वर्गात या चिमुकल्या मुली शिकत होत्या. त्या वर्गाच्या वर्गशिक्षिका आणि लहान मुलींना प्रसाधनगृहात नेआण करण्याची जबाबदारी असलेल्या आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पालक आणि पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य आणि कायदेशीर मदत संस्थेच्या वतीने केली जाईल, असंही शाळा प्रशासनाने म्हटलं आहे. शाळा प्रशासनाने घडलेल्या या प्रकाराबाबत सर्व पालकांची जाहीर माफी देखील मागितली आहे.
या प्रकरणी पालकांनी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यावर पोलीस प्रशासनाने देखील हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दबाव तंत्राचा वापर करून पालकांना घाबरवण्याचे आणि हे प्रकरण न वाढवण्याचा सल्ला दिला होता. मात्र पोलीस प्रशासनालाही न जुमानता पालकांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केल्यावर आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणात दडपशाहीचा आरोप ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्यावर लावण्यात आला होता त्यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे.
गुन्ह्याच्या दिवशी शाळेचे सीसीटीव्ही बंद
ज्या ठिकाणी ही घटना घडली आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी शाळेची सीसीटीव्ही बंद असल्यामुळे शाळा प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. नेमके सीसीटीव्ही बंद होते की पुरावा नष्ट करण्यात आला यावरून आता पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात वाद पेटला आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका निलंबित प्राथमिक विभागाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांना संस्थेने तात्काळ निलंबित केले आहे. सीसीटीव्ही आणि त्याची रेकॉर्डिंग सुरू आहे की नाही याची जबाबदारी मुख्याध्यापिकेवर असल्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यासोबत वर्गशिक्षिका आणि मुलांची नेआण करणाऱ्या दोन सेविकांना बडतर्फ करण्यात आले आहे.