त्या शाळेतील हे चौथे प्रकरण : शाळेने कारवाई केली नाही

शाळा प्रशासनाने ही प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न केला


टीम : ईगल आय न्यूज

बदलापुरातील नामांकित शाळेत चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण बदलापूर पेटून उठलं आहे. संपूर्ण बदलापुरात आज बंद पाळण्यात आला असून बदलापूरकरांनी मोठं आंदोलन केलं आहे. या शाळेतील ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी तीनवेळा अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्याच शाळेतील हे चौथे प्रकरण आहे. पण कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. शाळा प्रशासनाने ही प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न केला, कधीपर्यंत संयम बाळगायचा असा सवाल आता पालक करत आहेत.

यावेळी पालकांनी आरोपी नराधम अक्षय शिंदेविरोधात संताप व्यक्त केला. ज्या शाळेत त्यांने हे सगळ केलं त्याच शाळेत तिथेच त्याला शिक्षा व्हावी, अशी मागणी पालकांनी केलं आहे. तसेच, या शाळेतील हे पहिलं नाही तर चौथं प्रकरण असून यापूर्वीची प्रकरण शाळेकडून दाबण्यात आल्याचा दावा पालकांनी केला आहे. बदलापुरातील ज्या शाळेत त्या चिमुकलींवर अत्याचार झाला संतप्त आंदोलकांनी त्या शाळेचं गेट तोडून शाळेची तोडफोड केली. तसेच, गेल्या ५ ते ६ तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन सुरु आहे. हजारोंच्या संख्येने बदलापूरकर रेल्वे रुळावर उतरले आहेत. यावेळी पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले.

सध्या बदलापूर स्थानकात हजारो आंदोलक रेल्वे रुळावर उतरले आहेत. त्या तुलनेत पोलिसांचा फौजफाटा कमी पडतोय. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. पण, आंदोलनकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. सकाळी ६ वाजेपासून हे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

एक पालक म्हणाले की, माझी मुलगीही त्याच वर्गात शिकते ज्या वर्गातील मुलींसोबत हे घडलं, आज त्यांच्यासोबत झालं उद्या माझ्या मुलीसोबत होईल, न्याय मिळालाच पाहिजे. तर, एकाने सांगितलं की, सात दिवसांपासून कुठलीही कारवाई नाही, त्यानंतर आम्ही आंदोलन करण्यास सुरुवात केली.
एका आंदोलकाने सांगितलं की, जर यापूर्वीही शाळेत अशा प्रकारच्या घटना घडल्या असतील तर शाळेची त्याची दखल घेतली की नाही, त्यामधील आरोपींवर काय कारवाई केली, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शाळेच्या विश्वासहार्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच, यावेळी शांत बसणार नाही, जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. शाळा आणि रेल्वे रुळावरच नाही तर आता बदलापूरच्या रस्त्यांवरही लोक बाहेर पडली आहे. आरोपीला शाळेसमोर जाळा, त्याला शाळेसमोरच फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!