मुलीची आत्महत्या उघडकीस : 4 उच्चवर्णीय युवकांविरोधत गुन्हा दाखल
टीम : ईगल आय मीडिया
बिहारमधील गया येथे एका अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघड झाली आहे. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आणि बिहार पोलिसांनी ही नातेवाईकांच्या परस्पर पीडित मुलीवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यामुळेच बिहारमध्ये ही आता वातावरण तापू लागले आहे.
गयामधील कोच भागात एका अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. दलित मुलीने सामूहिक अत्याचारानंतर फाशी घेत आत्महत्या केली. ही घटना २९ सप्टेंबरला घडली. या बाबत हाती आलेल्या वृत्तानुसार, ३० सप्टेंबरला पीडित मुलगी शेजारच्या घरात वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली होती. तेथून ती घरी परतत होती. त्याच वेळी गावातील काही मुलांनी या मुलीला एका मोकळ्या घरात नेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
या अत्याचारानंतर पीडित मुलगी घरी आली आणि तिने घरातील खोली बंद करून गळफास घेतला. घरातील लोकांनी दरवाजा तोडल्यानंतर मुलगी फाशी घेत लटकलेल्या अवस्थेत आढळली. तातडीने पीडित मुलीला रुग्णालयात नेण्यात आले.
डॉक्टरांनी अधिक चांगल्या उपचारासाठी मुलीला पाटण्याला नेण्याचा सल्ला दिला. उपचाराच्या दुसऱ्या दिवशी या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणूक पाहता या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा मुद्दा पेटण्याची दाट शक्यता आहे.