कवठेमहांकाळ तालुक्यात खा.संजय पाटील आणि आ.सुमनताई पाटील समर्थक भिडले.
टीम : ईगल आय मीडिया
बोरगाव ( ता. कवठेमहांकाळ जि. सांगली ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवेळी खा.संजय पाटील आणि आम. सुमन पाटील समर्थक सदस्यांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. पांडुरंग जनार्दन काळे असं मृत ग्रामपंचायत सदस्याचं नाव आहे. गुरुवार ( दि.4 मार्च ) रोजी ही घटना घडली आहे.
बोरगाव ग्रामपंचायतीच्या रिक्त उपसरपंच पदाची आज निवड होणार होती. ग्रामपंचायत मध्ये खा.संजय पाटील गटाचे 11 पैकी 8 सदस्य आहेत, तर 3 सदस्य आमदार सुमन पाटील गटाचे आहेत. खासदार संजय पाटील समर्थक 2 सदस्य फोडून आ.पाटील समर्थक गटाचा उपसरपंच निवडण्याची रणनीती आखली होती. उपसरपंच निवडीबाबत सदस्याची आज विशेष सभा बोलावण्यात आली होती.
यावेळी सदस्य मतदानासाठी ग्रामपंचायतीच्या आवारात आले असता दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी आ.पाटील गटाचे पांडुरंग जनार्दन काळे (वय 58) या ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. पांडुरंग काळे हे शिवसेना पक्षाचे सदस्य होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी खून केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. बोरगावमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पांडुरंग काळे यांचा खून झाला असून या घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश पाटील यांच्यासह 2 सदस्य जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या घटनेप्रकरणी चौकशीला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती आहे.