लक्ष्मी दहिवडी येथील 3 अल्पवयीन मुलांची अचंबित स्टोरी
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
टीव्ही वर सी आय डी मालिका पाहून तीन मुलांनी आपल्याच अपहरणाचा बनाव रचला, तोंडावर पावडर टाकून आपल्याला पळवून नेले होते असे सांगितले मात्र पोलीस चौकशीत मुलांचा बनाव उघडकीस आला. आणि पोलिसांसह पालकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.
लक्ष्मी दहिवडी ( ता. मंगळवेढा ) येथील तीन मुलांचे अपहरण झाल्याची बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. आणि पालक हादरून गेले तसाच पोलिसांनाही घाम फुटला. एका दुकानदाराच्या फोन नंतर मुलांचा तपास लागला,मुले सुखरूप मिळलीसुद्धा मात्र त्यानंतर जे उघडकीस आले ते ऐकून पोलीस आणि पालकही अचंबित झाले.
मुलांना गोड बोलून चार तासाच्या सखोल चौकशीनंतर टि.व्ही.वरील सी.आय.डी. मालिका पाहून आपल्याच अपहरणाचा केलेला बनाव केल्याचे उघडकीस आले.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे कि, लक्ष्मी दहिवडी येथील 11,१२ व १५ या वयाचे बालमित्र आहेत. दि. ३० जुलै रोजी सकाळी १० वा. खेळण्यासाठी ते घराच्या बाहेर पडले. हे तिघेजण फिरत – फिरत आंधळगाव येथील वनक्षेत्रामध्ये गेले. त्यानंतर पुढे पायी चालत महमदाबाद शेटफळ या गावी पोहोचले.
महमदाबाद शेटफळ येथील एका पानटपरीवर जावून त्यांनी आम्हाला एका अज्ञात व्यक्तीने कारगाडीत घालून तोंडावर गुंगीची पावडर टाकून आणल्याचे सांगितलेे. तर इकडे गावी सकाळी मुले खेळण्यासाठी बाहेर पडली ती सायंकाळपर्यंत घरी न आल्याने तिघांचेही आईवडिल चिंतेत पडले.
मुलांनी आम्ही लक्ष्मी दहिवडी तील आहोत हे सांगितल्यानंतर पानटपरी चालकाने लक्ष्मी दहिवडीतील कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती प्रकाश जुंदळे यांना सम्पर्क साधला. त्यांनी तात्काळ संबंधित पालकांना कळविले आणि पालकांनी महमदाबाद शेटफळ येथे जावून आपली मुले ताब्यात घेतली. घरी आल्यावर पोलिस पाटील मधुकर पाटील यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी मुलांच्या घरी जाऊन माहिती घेतली.
सायंकाळी राञी उशीरा अपहरण करणार्या अज्ञात कार चालकाविरोधात तक्रार देण्यासाठी पालक व पोलिस पाटील मधुकर पाटील हे मुलासह गुरुवारी रात्री ९ वा. पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.
पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी त्या तीन मुलांकडे चार तास वेगवेगळ्या खोलीत एका-एका मुलाला घेऊन चौकशी केल्यानंतर त्या तिघांनी प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे दिली. त्या मुलांनी आपण टि. व्ही.वरील सी.आय.डी. मालिका बघून, आम्हाला गुंगीची पावडर टाकून अपहरण केल्याचा बनाव केल्याचे चौकशी अंती सांगितले. तशा प्रकारचा त्या तीघांकडून लेखी जबाब घेवून त्यांना सोडून देण्यात आले.
चौकशी अंती या घटनेचा बनाव समोर आला आणि मुलांनी केलेला अपहरणाचा बनाव असल्याचे चौकशी अंती स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.