चोरीच्या 46 मोटार सायकली पोलिसांनी पकडल्या

मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद : पंढरपूर शहर पोलीसांची कामगिरी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरांची टोळी जेरबंद केली असून 14 लाख रुपये किमतीच्या तब्बल 46 मोटारसायकल ताब्यात घेतल्या आहेत. या संदर्भात आज जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पोलीसांनी या प्रकरणातील 5 पैकी 4 आरोपींना अटक केली असून मुख्य एक आरोपी अद्यापही फरार आहे. दुचाकी चोरी करणार्‍या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

21 मे रोजी दुचाकी चोरीबाबत शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पंढरपूर शहर पोलीस त्यांच्या रॅकॉर्डवरील आरोपी पंढरपूर शहरातील संभाजी चौक येथील अतूल नागनाथ जाधव याच्या हालचालीवर पोलीसांची नजर होती. त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता, त्याने पंढरपूर शहरातून व इतर ठिकाणाहून 9 मोटार सायकली चोरल्या असल्याचे निष्पन्न झाले.

शहरातील एका संशयीत आरोपीने 7 दुचाकींची चोरी केल्याप्रकरणी ताब्यात घेतले असता त्याच्यासह इतर 4 आरोपींनी पंढरपूर, नातेपुते, माळशिरससह इतर जिल्ह्यांतून 14 लाख 15 हजार रुपये किंमतीच्या 46 मोटार सायकली चोरी करुन विक्री केल्याचे कबूल केले आहे. या चोरलेल्या मोटार सायकलीपैकी एक मोटार सायकल नातेपुते येथील त्याच्या मित्रास विकली असल्याचे सांगीतले. त्या मित्रास ताब्यात घेवून चौकशी केली असता अतूल जाधव याने 7 मोटार सायकली त्याच्याकडे विक्री करण्यास दिल्यांचे निष्पन्न झाले. या दोघांना पोलीसांनी अटक करुन त्यांच्याकडून 16 मोटार सायकली जप्त केल्या आहेत.


या गुन्ह्यातील नातेपुते येथील शकील शेख या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता मोरोची ( ता. माळशिरस ) येथील अभिमान खिलारे यांच्याकडे मोटार सायकली विक्री करीता आरोपी शेख हा देत होता.अभिमान खिलारे या आरोपीकडे चोरीतील 15 मोटार सायकली आढळून आल्या. त्या पोलीसांनी जप्त केल्या आहेत.
आरोपी खिलारे याच्याकडे पोलीसांनी अधिक चौकशी केली असता तो घाणंद, ( ता. आटपाडी ) येथील प्रणव ढगे याच्याकडे विक्रीसाठी देत होता. प्रणव ढगे यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने 15 मोटार सायकली विक्री केल्या असल्याचे सांगीतले.


विक्री केलेल्या 15 मोटार सायकली पोलीसांनी जप्त केल्या आहेत. तर यातील मुख्य आरोपी नामदेव बबन चुनाडे (रा.पंढरपूर) हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या आरोपींनी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील मोटार सायकली चोरल्या आहेत.
या आरोपींवर पंढरपूर शहर, नातेपूते पोलीस ठाणे, माळशिरस पोलीस ठाणे, इंदापूर पोलीस ठाणे येथे मोटार सायकल चोरी, जबरी चोरी, बलात्कार , धमकी देणे आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
पंढरपूर शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी चार आरोपींना अटक करुन 14 लाख 15 हजार रुपये किंमतींच्या विविध कंपनींच्या 46 मोटार सायकली जप्त केल्या आहेत.


सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, डिवायएसपी विक्रम कदम, पो.नि. अरुण पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र मगदूम व त्यांच्या टिमने केले आहे. पुढील तपास पो.ह. सुरज हेंबाडे, बिपीनचंद्र ढेरे, पो.ना. शोएब पठाण, महेश पवार हे करत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!