गजानन मारणे सोमवारी सुटला : मंगळवारी अटक

शक्ती प्रदर्शन आणि दहशत पसरवणे महागात पडले


टीम : ईगल आय मीडिया
खूनाच्या गुन्ह्यातून काल सोमवारी निर्दोष मुक्तता झालेल्या कुख्यात गुंड गजानन मारणे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये मारणेवर आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. सोमवारी तळोजा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर मारणे आणि त्याच्या साथीदारांनी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर उर्से टोलनाकापर्यंत ५०० हुन अधिक वाहनांच्या ताफ्यासह फटाके वाजवून मिरवणूक काढली. यावेळी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणी मारणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुण्यातील दोन हत्या प्रकरणातून तळोजा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर मारणे याने ३०० गाड्यांच्या ताफ्यासह मिरवणूक काढली. या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. तुरुंगातून सुटल्यानंतर अशा पद्धतीने मिरवणूक काढणे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे, असेही गृह राज्यमंत्री देसाई म्हणाले.

काल सोमवारी मारणे याची तळोजा कारागृहातून मुक्तता करण्यात आली. त्यावेळी कारागृहाबाहेर त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मारणेची मिरवणूक एक्स्प्रेस वेवरून काढण्यात आली. दरम्यान त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाक्यावर फटाके फोडले. तसेच आरडाओरड देखील केला. यावेळी त्याने ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरणही देखील केले. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मारणेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

error: Content is protected !!