मोहोळ : ईगल आय मिडीया
मोहोळ येथील क्षिरसागर-सरवदे दुहेरी खून प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित आरोपी भैय्या असवले याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने २६ जुलै पर्यंत वाढ केली. अटकेत असलेल्या आरोपीला इतर आरोपींचा ठावठिकाणा माहीत असल्यामुळे पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी पोलिसांकडून न्यायालयाला करण्यात आली होती. त्यानुसार सोलापूर जिल्हा विशेष न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ केली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, १४ जुलै रोजी मोहोळ येथील शिवसैनिक सतीश क्षिरसागर व विजय सरवदे यांच्या दुचाकीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टेम्पो घालून अपघाताचा बनाव केला होता. यामध्ये सतीश क्षिरसागर जागीच ठार झाला होता. तर विजय सरवदे याचा १९ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी भैय्या असवले, संतोष जनार्दन सुरवसे, रोहीत उर्फ अण्णा फडतरे, पिंटू जनार्दन सरवदे (सर्व रा. मोहोळ) पैकी भैय्या असवले यास मोहोळ पोलिसांनी अटक केली होती. तर उर्वरीत तीन आरोपी फरार झाले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणात आणखी दोन आरोपींचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आकाश उर्फ गोटू नामदेव बरकडे आणि संदिप ऊर्फ गोट्या सरवदे (दोघे रा. मोहोळ) अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता सहा झाली असून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मोहोळ न्यायालयाने अटकेत असलेला आरोपी भैय्या असवले यास ते २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने व या प्रकरणात ॲट्रॉसिटी लागल्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी आरोपीस सोलापूरच्या विशेष न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. फरार असलेले आरोपी सध्या कोठे लपून बसले आहेत याबाबतची संपूर्ण माहिती अटकेतील आरोपीला माहित आहे. त्यामुळे त्याच्याकडे तपास करून फरार असलेल्या आरोपी पकडले जाऊ शकतात असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.
सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने या असले या आरोपींच्या पोलिस कोठडीत २६ जुलै पर्यंत वाढ केलेली आहे. मात्र या तीन दिवसात फरार आरोपींना अटक करण्याचे कठीण आव्हान देखील पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सोलापूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे हे करीत आहेत.