मोहोळ दुहेरी खून प्रकरण : फरार आरोपींना पोलिसांनी पकडले

कर्नाटकात लपले होते : सापळा लावून शिताफीने केले जेरबंद

मोहोळ : ईगल आय मिडिया

मोहोळ येथील क्षीरसागर-सरवदे दुहेरी खून प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यात मोहोळ पोलिसांना यश आले. आळंद कर्नाटक परिसरातून पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले. संतोष जनार्दन सुरवसे, रोहित उर्फ अण्णा फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे, आकाश उर्फ गोटू नामदेव बरकडे, संदिप ऊर्फ गोट्या सरवदे (सर्वजण रा. मोहोळ जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, १४ जुलै रोजी मोहोळ येथील सतीश क्षीरसागर आणि विजय सरवदे या शिवसैनिकांच्या दुचाकीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टेम्पो घालून घातपाताचा बनाव केला होता. यामध्ये सतीश क्षीरसागर हा जागीच ठार झाला होता. तर विजय सरवदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात मोहोळ पोलिसांनी भैय्या असवले यास ताब्यात घेऊन सुरुवातीला चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान आणखी दोघांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींची संख्या सहा इतकी झाली होती. मात्र भैया असवले वगळता उर्वरित पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते.


मोहोळ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे (डीबीचे) पोलिस कर्मचारी सुरुवातीपासूनच फरार आरोपींच्या मागावर होते. दरम्यान फरार आरोपी कर्नाटक राज्यातील आळंद परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक धनाजी खापरे, हेड कॉ. शरद ढावरे, पो.कॉ. गणेश दळवी, पांडूरंग जगताप, हरिष थोरात यांच्या पथकाने सोमवार २ ऑगस्ट रोजी हिरोळी ( ता. आळंद, कर्नाटक) येथे साध्या वेशात सापळा लावला होता.

सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान या खुन प्रकरणातील संशयीत फरार आरोपी संतोष जनार्दन सुरवसे, रोहित उर्फ अण्णा फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे, आकाश उर्फ गोटू नामदेव बरकडे, संदिप ऊर्फ गोट्या सरवदे (सर्वजण रा. मोहोळ जि. सोलापूर) त्याठिकाणी आले. यावेळी पोलिस पथकाने गराडा घालून मोठ्या शिताफिने त्यांना पकडले.
रात्री पावणेअकरा वाजता सर्व आरोपींना मोहोळ पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

आज ३ ऑगस्ट रोजी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. मोहोळ पोलिसांनी केलेल्या या कारवाई बद्दल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस निरीक्षक अशोक सायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!