मित्रांना पाठवली रिक्वेस्ट : पोलीस दलात खळबळ
टीम : ईगल आय मीडिया
नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे बनावट फेसबुक अकाऊंट बनवून त्याद्वारे त्यांच्याच मित्रांना तसेच इतरही अनेकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविण्यात आल्याचे गुरुवारी उशिरा रात्री उघडकीस आले. पोलीस आयुक्तांचेच बनावट फेसबुक अकाऊंट बनवल्याचे समजल्या नंतर नागपूर शहर पोलिस दलात खळबळ उडाली. सायबर सेलने या प्रकाराची गंभीर दखल घेत बनावट अकाऊंट उघडणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळी अमितेशकुमार यांच्या नावाचे बनावट एफबी अकाऊंट उघडण्यात आले. त्याद्वारे अमितेशकुमार यांच्या ओळखीच्या ३२ जणांना ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठविण्यात आली. काहींनी ती स्वीकारली .
दरम्यान आधीच ‘फेसबुक फ्रेण्ड’ असताना पुन्हा ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ आल्याने त्यांच्या काही मित्रांनी अमितेशकुमार यांच्याशी थेट संपर्क साधला.आपण कोणत्याही प्रकारची ’फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठविली नसल्याचे अमितेशकुमार यांनी त्यांना सांगितले.
हा बनावट प्रकार असल्याचे लक्षात येताच अमितेशकुमार यांनी लगेच सायबर सेलला याबाबत कळविले. बनावट अकाऊंट तयार करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.
अशा महाठकाचा ‘चांगलाच’ सत्कार करणे आवश्यक आहे.