पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट फेसबुक खाते

पोलीसांच्या नावे पैसे मागण्याचा आणखी एक प्रकार

टीम : ईगल आय मीडिया

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून युजर्स, मित्रांकडे पैसे मागितल्याचे प्रकरण पुन्हा समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या नावे सोशल मीडियावर पैसे मागण्याचा नवीन प्रकार सुरू झाल्याचे दिसते.

विशेष म्हणजे 6 दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून युजर्सकडे 10 हजार रुपये मागितल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी त्यांनी अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट शेअर करत बनावट फेसबुक आणि आर्थिक फसवणूकीपासून सावध राहा अस म्हटलं होतं.

दरम्यान पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर यांचेही मागील महिन्यात बनावट फेसबुक अकाउंट बनवून त्यांच्या मित्रांकडे पैशाची मागणी करण्यात आली होती. हा प्रकार लक्षात येताच अवचर यांनी तातडीने सायबर कडे तक्रार करून बनावट खाते बंद करण्याची कारवाई झाली होती.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अधिकृत फेसबुक पेजवर बनावट अकाउंटवरून पैसे मागितल्याचा फोटो आणि मजकूर पोस्ट केला होता. तसंच त्यांनी अशा बनावट फेसबुक अकाउंटपासून आणि आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा असं म्हटलं होतं. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली होती.

त्यानंतर आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस उपनिरीक्षकाचा फेसबुक प्रोफाइल फोटो, नाव वापरून अज्ञात व्यक्तीने बनावट अकाउंट तयार केले. त्यांच्या अनेक मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, त्यानंतर फेसबुकच्या मेसेंजरवर पैशांची मागणी केली. काही मित्रांनी फोन करून कशाला पैसे हवेत असं त्या पोलीस उपनिरीक्षकाला विचारलं. तेव्हा झालेला प्रकार पोलीस उपनिरीक्षकाच्या लक्षात आला.

त्यानंतर त्यांनी तातडीने अधिकृत फेसबुकवर पोस्ट करून संबंधित घटनेची माहिती युर्जसना दिली आणि आर्थिक फसवणुकीपासून इतरांना सावध केले आहे. या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत.

2 thoughts on “पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट फेसबुक खाते

  1. चोरट्यांचा सत्कार केला पाहिजे अधिकारी पण निवडताना अभ्यास करतंय 🤪🤪

Leave a Reply

error: Content is protected !!