माळशिरस : ईगल आय मीडिया
वेळापूर ( ता. माळशिरस ) पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव, पोलीस नाईक विनोद साठे यांच्या सह इतर 30 हुन अधिक लोकांवर कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन व बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी वेळापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान १८६० चे १४३,१८८,२६९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दि.०२ मार्च रोजी संध्याकाळी ७.३० ते ९.०० या वेळेत वेळापूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज चौकातील पालखी तळावर पोलीस नाईक विनोद साठे व त्यांच्या मित्रांनी मोठ्या स्वरूपात वाढदिवस साजरा केला आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे अशा वेळी शासनाने वेळोवेळी पारित केलेल्या नियमांचे सर्वांनीच पालन करावे, गर्दी करणे टाळावे , मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा नियमांचं उल्लंघन करणार्यांविरोधात उचित व योग्य कारवाई केली जाईल कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही यामुळे सर्वांनी सहकार्य करावे.
भगवान खारतोडे , पोलीस निरीक्षक वेळापूर
सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे तसेच कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच बेकायदेशीरपणे जमाव जमवून विनामास्क व सोशल डिस्टन्स न पाळता वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा केला.
डीजे लावून त्यासमोर नाचून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारण ठरेल असे कृत्य केले, अशा आशयाची फिर्याद पो.काॅ.महेश पोरे यांनी दिली आहे.त्यानुसार सपोनि दीपक जाधव, पोलीस नाईक विनोद साठे यांच्यासह 30 हुन अधिक जनांविरोधात वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे करीत आहेत.