2 आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी
पंढरपूर : ईगल आय न्यूज
शहर व तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या लखन गांडुळे खून प्रकरणातील आरोपींचा पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी सहा तासात शोध घेतला असून लखन गांडूळे याच्या दोन मित्रांना या प्रकरणी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कुठली सुनावली आहे. दरम्यान हा खून मैत्रिणीच्या प्रकरणावरून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सोमवारी भंडीशेगाव ( ता.पंढरपूर ) येथील लखन सुनील गांडुळे (वय 25 वर्षे )या युवकाचा मृतदेह वाखरी येथील एका विहिरीत आढळून आला. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी पुढील तपास सुरू केला. या तपासकामी पंढरपूर शहर व पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याची पथके कामास लावली होती.
मिळालेल्या संदर्भानुसार तपास करीत अवघ्या सहा तासातच पोलिसांनी आरोपीना कैद केले. युवराज सातपुते आणि कुमार मेटकरी या दोन आरोपींना अटक केली. हे दोन्हीही आरोपी लखन गांडुळे याचे मित्र आहेत. मैत्रिणीवरून यांच्यामध्ये वाद झाल्याचे व त्यातूनच लखनचा खून केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे.
मंगळवारी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता ५ दिवस ( दिनांक २८ ऑगस्टपर्यंत ) त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. पुढील तपास पंढरपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे करीत आहेत.