ज्वेलर्स दुकान फोडून ३ कोटी रुपयांचे सोने पळवले

टीम : ईगल आय मीडिया
मुंबईच्या लालबाग – काळाचौकी येथील आंबेवाडी परिसरात असलेली मंगल ज्वेलर्स हे सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान फोडून तब्बल ३ कोटी रुपयांचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे. चोरांनी दुकानाचे शटर तोडून चोरांनी सुमारे तीन कोटी रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने लांबविले. इतक्या मोठ्या रकमेचा ऐवज चोरीला गेल्यामुळे लालबागमधील व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

दुकान फोडण्याआधी चोरांनी या जागेची रेकी करून नियोजनपूर्वक ही चोरी केल्याचे दिसत आहे. दुकानबाहेरच बेस्टचा विजेचा खांब असून या खांबाला वीजप्रवाह करणारी वायर कापण्यात आली आहे. सीसीटीव्ही फोडण्यात आले असून डेटा सेव्ह होणारा डीव्हीआरही चोरांनी पळविला आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटविणे हे पोलिसांपुढील मोठे आव्हान आहे.

आंबेवाडी परिसरात पूजा हॉटेलजवळ मंगल ज्वेलर्स हे दुकान आहे. सोमवारी सकाळी वॉकसाठी बाहेर पडलेल्या काहींनी दुकान उघडे असल्याचे पाहिले. इतक्या सकाळी दुकान कसे उघडले? असा प्रश्न त्यांना पडला. त्यातच दुकानात अंधार असल्याने यापैकी काहींनी मालकाला फोन करून कळविले. मालक घटनास्थळी पोहोचल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. रविवारी मध्यरात्री किंवा सोमवारी पहाटेच्या दरम्यान चोरांनी हे काम केल्याची शक्यता आहे. रविवारी सायंकाळी मालक नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती काळाचौकी पोलिसांना दिली.

काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता दोन कोटी ८२ लाखांचा ऐवज गायब असल्याचे समजले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपायुक्तांनी तपासाकरिता चार पथके बनविली आहेत. तसेच गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाचाही समांतर तपास सुरू आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!