पुण्यात थरार : भर दिवसा गोळ्या घालून हत्या

पूर्ववैमनस्यातून हल्ला करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज

टीम :  ईगल आय मीडिया

गोल्डमन अशी ओळख असलेल्या सराईत गुन्हेगार सचिन शिंदे याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. पुणे- नगर रस्त्यावरील लोणीकंद येथे एक्सिस बँकेच्या समोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मंगळवारी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये त्या सराईताचा मृत्यू झाला असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन नाना शिंदे (वय २९, रा. लोणीकंद) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. लोणीकंद भागात सचिन हा गोल्डमॅन म्हणून ओळखला जायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन शिंदे हा पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह इतर गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता.

मंगळवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास तो लोणीकंद येथील एक्सिस बँकेजवळ तो उभा होता. त्यावेळी एक्टिव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने सचिन शिंदेवर गोळी झाडली. नंतर हल्लेखोर पसार झाले.

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने आरोपींचा शोध सुरू केला आहे. गोळीबार पूर्ववैमनस्यातून करण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत पोलीस उपअधीक्षक सई भोरे पाटील यांनी सांगितले की, दुचाकीवर आलेल्या एकाने पाठीमागून सचिन शिंदेवर गोळीबार केला. त्याच्या मानेजवळ गोळी लागली असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर पळून गेले आहेत. याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!