तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा दहशत निर्माण करणे महागात पडले.
टीम : ईगल आय मीडिया
कुख्यात गुंड गजा मारणेला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी गजा मारणेविरोधात एमपीडीएचा प्रस्ताव दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे त्याला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं आहे. गजा मारणेवर खून, मारामारी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. एकंदरित ही मिरवणूक त्याला चांगलीच महागात पडली.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गजा मारणेला स्थानबद्ध केलं आहे. येत्या वर्षभरात पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा ची निवडणूक असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा सुव्यवस्था रहावी म्हणून 1 वर्षासाठी गजा मारणे ला स्थानबद्ध करण्यात आल्याचे मानले जाते.
गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला कुख्यात गुंड गजा मारणेला सातारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मेढा पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन गजा मारणेला जेरबंद केलं. क्रेटा गाडीतून त्याची जावळी-महाबळेश्वरात हवा चालली होती. अखेर सातारा पोलिसांना त्याची चाहूल लागताच पोलिसांनी अगदी शिताफीने त्याला बेड्या ठोकल्या.
पुणे पोलिसांना गुंगारा देऊन त्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला होता. गेल्या अनेक दिवस पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून गजा मारणेला मेढा पोलिसांनी अटक केली आहे.