नाशिक जिल्ह्यात पतीचा पत्नीवर हल्ला : स्वतः ही केला आत्महत्येचा प्रयत्न
टीम : ईगल आय मीडिया
नाशिक जिल्ह्यात पत्नीच्या माहेरी जाऊन तिला ‘हॅपी बर्थडे’ म्हणून शुभेच्छा देत पतीनेच तिच्या पोटात चाकू खुपसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर आरोपी पतीने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये पती-पत्नी दोघंही गंभीर जखमी झाले आहेत, संशयित आरोपी असलेल्या पतीचे नाव संतोष पवार असे आहे.
गेल्या तीन वर्षांपासून या दोघा पती-पत्नींमध्ये कौटुंबिक वाद सुरु आहे. त्यातूनच वाढदिवसानिमित्त नांदूर शिंगोटे (ता. सिन्नर ) येथे माहेरी असलेल्या कमल पवार यांच्या घरात घुसून पती संतोषने हा प्रकार केला. वाढदिवसाच्या दिवशीच पती संतोष पवारने पत्नीला शुभेच्छा देत पोटात चाकू खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर संशयित आरोपीने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. हल्ल्यात पती-पत्नी दोघेही अत्यवस्थ असून त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.