तपासाचे सांगोला पोलिसांसमोर आव्हान
सांगोला : ईगल आय मीडिया
गौडवाडी ( ता. सांगोला जि. सोलापूर) येथील बुद्धेहाळ तलावात सुमारे ४० ते ४५ वयाच्या अज्ञात व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह सापडला असून पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने पुरुष जातीचे प्रेत दगड बांधून पाण्यात टाकून दिले असल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने सांगोला तालुक्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सांगोला पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सोपान जनार्धन गडदे (पोलीस पाटील, गौडवाडी ता. सांगोला) यांना दिनांक १५ जुलै रोजी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास चुलत भावाचा फोन आला की, बुध्देहाळ तलावात दक्षिण दिशेच्या बाजूला एक प्रेत पाण्यावर तरंगत आहे. याबाबत पोलीसांना कळवल्यानंतर सांगोला पोलीस घटनास्थळी पोहोचले व पोलीसांनी जमलेल्या लोकांच्या मदतीने सदरचे प्रेत पाण्यातून बाहेर काढले.
प्रेत बांधावर आणून पाहिले असता, हिरवे- पांढरे रंगाच्या चटई आणि निळे- लाल रंगाच्या शेडनेटमध्ये गुंडाळलेले दिसले. गुंडाळलेल्या शेडनेटला एक मोठा दगड बांधलेला होता. प्रेतास डोके नाही तर खांदयापासून खालील शरीर पाण्यात भिजून पुर्णपणे कुजलेले होते. प्रेताचे दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून मागील बाजूस बांधलेले तर दोन्ही हात शरीरापासून वेगळे झालेले दिसले. ‘असे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत सांगण्यात आले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहा. पो.नि. प्रशांत हुले, पो.ना. विजयकुमार थिटे, राजकुमार चौगुले, पो. हे. कॉ. आप्पासो पवार, पो.कॉ. गणेश कुलकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ज्या बुध्देहाळ तलावात मृतदेह सापडला आहे तो तलाव सोलापूर व सांगली या दोन जिह्याच्या सीमेवर असून तलावाचे पाणलोटक्षेत्र व परिसर विस्तीर्ण असा आहे, त्यामुळे या खुनाचा उलगडा करणे पोलीसांसाठी मोठे आव्हान आहे.