सत्ययुगात जिवंत होतील म्हणून मुलींची केली हत्या !

मुख्याध्यापक दाम्पत्याने उच्चशिक्षित मुलींची अंधश्रद्धेतून केली हत्या

टीम : ईगल आय मीडिया

पेशाने मुख्याध्यापक असलेल्या अंधश्रद्ध आई-वडिलांनी पोटच्या दोन उच्च शिक्षित मुलींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी सतयुग सुरु होणार असल्यामुळे सुर्योदयाला दोन्ही लेकी पुन्हा जिवंत होतील, असा दावा या माता-पित्याने केला आहे. पोलिसांनी दोघानाही अटक केली आहे.

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामधील मदनापल्ले गावात रविवारी रात्री हत्याकांड घडले. 27 वर्षीय अलेख्या आणि 22 वर्षीय साई दिव्या अशी मयत तरुणींची नावं आहेत. तर आरोपी आई पद्मजा आणि वडील पुरुषोत्तम हे दोघंही मुख्याध्यापक आहेत.

दोन्ही मुली जिवंत होतील : पालकांचा होता दावा। आरोपी दाम्पत्याच्या चेहऱ्यावर गुन्ह्यानंतर अजिबात तणाव दिसत नव्हता. पोलिसांनी हत्येचं कारण विचारलं असता त्यांनी कलियुग समाप्त होत असून सोमवारपासून सतयुग सुरु होणार आहे. त्यामुळे दोन्ही मुली सूर्योदयासोबत जिवंत होतील, असा दावा त्यांनी केला.

मोठी मुलगी अलेख्याने भोपाळमधून मास्टर्स डिग्री मिळवली आहे. धाकटी कन्या साई दिव्या हिचं बीबीएपर्यंत शिक्षण झालं आहे. साई दिव्या मुंबईत एआर रहमान म्युझिक स्कूलची विद्यार्थिनी होती. लॉकडाऊनच्या काळात ती घरी परतली होती.


रविवारी रात्री घरातून आरडाओरड ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. डोक्यात डंबेल्सनी प्रहार करुन निर्दयी मातापित्याने लेकींचा बळी घेतल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा दाम्पत्याने त्यांची अडवणूक केली. मात्र पोलिसांनी घरात जाऊन पाहणी केली तेव्हा सगळेच अवाक झाले. एका मुलीचा मृतदेह पूजेच्या खोलीत होता, तर दुसरी मुलगी बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळली. दोघींचे मृतदेह लाल रंगाच्या कापडाने झाकले होते. पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला ताब्यात घेतलं आहे. दोघींचे मृतेदह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!