टीम : ईगल आय मीडिया
बिहारची राजधानी पाटणा शहरात कोरोनाग्रस्त पत्नीची हत्या करुन रेल्वे अधिकारी पतीनेही आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गळा आवळून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं. बिहारची राजधानी पाटणा शहरात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पती अतुल लाल हे बिहारमध्ये स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते. तुलिका लाल यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने अतुल लाल त्रस्त होते. त्यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली होती. त्यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
कोरोनाची लागण झाल्यावरुन तुलिका आणि पती अतुल यांच्यात वाद झाला होता. रागाच्या भरात अतुल यांनी पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन अतुल यांनी उडी घेतली.
अतुल लाल हे पाटणा जंक्शनला स्टेशन मास्तर होते. पाटण्यातील पत्रकार नगरमधील ओम रेसिडन्सी अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. अतुल आणि तुलिका यांच्या नातेवाईकांनी पत्रकार नगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक तपास सुरु केला.