ढाबा चालकानेे ‘पळवाट’ शोधली ; पण पोलिसांनी ‘वाट’ लावली

पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यातील सोनके गावाजवळ कृषी केंद्र असा बोर्ड लावलेल्या दुकानात अवैध देशी दारूची विक्री सुरू होती. सुरुची ढाबा येथे हा अवैध दारु अड्डा सुरु होता मात्र ग्रामीण पोलिसांनी या प्रकारास पायबंद घातला आहे.
कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने फक्त मेडिकल आणि शेती औषधे आणि खत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सवलतीचा फायदा घेत सोनके येथील ढाबेवाल्याने आपल्या हॉटेलवर ‘जय मल्हार ऍग्रोटेक’चा बोर्ड लावून अवैद्य दारु विक्रीचे दुकान थाटले.
पण पंढरपूर ग्रामीण पोलिसांना याचा सुगावा लागताच या बोगस दुकानावर छापा टाकून पोलिसांनी विविध कंपन्यांची दारु जप्त केली असून दारु गुत्तेदार काशीलिंग उर्फ लिंगाप्पा कोळेकर याला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.
लॉकडाऊनमध्ये ढाबा बंद करण्याच्या सूचना आल्याने, ढाबा चालक लिंगाप्पा कोळेकर याने आपल्या हॉटेल कम ढाब्याच्या दुकानावर ‘जय मल्हार ऍग्रोटेक’ नावाचा बोर्ड लावून या दुकानात शेती औषधे व खत विक्री केले जात असल्याचा भास निर्माण केला.
अवैद्य दारु विक्रीची तालुक्यात कडक अंमलबजावणी होत असताना कोळेकरने नामीयुक्ती शोधून आपली दारु विक्री खुलेपणाने सुरु ठेवली होती.
या दुकानाकडे पाहताच क्षणी औषधी दुकान असल्याचा भास होत होता. मात्र या औषध दुकानातील बॉक्समध्ये विविध कंपन्यांच्या दारुच्या बाटल्या ठेवलेल्या पोलिसांना आढळून आल्या असून 2500 रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पंढरपूर उपविभागाचे डीवायएसपी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या पथकाने केली. यात पोलीस शिपाई विलास घाडगे, हुलजंती, विशाल भोसले यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.