7.5 लाखाची लाच : सोलापुरात 2 पोलीस अधिकारी पकडले

10 लाखांची होती मागणी : अँटी करप्शन ची कारवाई


सोलापूर : ईगल आय मीडिया

गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मदत करतो म्हणून आरोपीकडून साडेसात लाख रुपयांची लाच घेताना सोलापुरातील सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह, सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. कारवाई शुक्रवार दि. 9 जुलै रोजी झाली असून पोलीस निरीक्षक संपत नारायण पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे (रा. सोलापूर) असे दोघा लाचखोर पोलीस अधिकार्‍यांची नावे आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरूम चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील आरोपींना मदत करून गुन्ह्यातून सही सलामत सुटण्यासाठी सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याच्या करवी 10 लाख रूपयाची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती साडेसात लाख रूपये देण्याचे ठरले. त्यावरून तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

त्यानंतर तक्रारीची खातरजमा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक कविता मुसळे आणि संजीव पाटील यांच्या पथकाने जुना पुना नाका, छत्रपती संभाजी महाराज चौकात सापळा लावला असता, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याने पैसे स्विकारत असताना त्याला रंगेहात पकडले.

त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत पवार यांच्या सांगण्यावरून त्यांच्यासाठी लाचेची रक्कम स्विकारली असल्याचे कबुल केले. त्यावरून पोलीसांनी पोलीस निरीक्षक संपत पवार यांना शासकीय विश्रामगृहातून ताब्यात घेतले आणि त्या दोघां विरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

error: Content is protected !!