जळोलीत दरोडा : लाखों रुपयांचा मुद्देमाल लंपास

चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम, सोने आदी साहित्य लुटले


पंढरपूर : ईगल आय मीडिया

जळोली (ता.पंढरपूर) येथील धायगुडे वस्ती येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास नागन्नाथ भानुदास नरसाळे यांच्या वस्तीवर अनोळख्या आठ व्यक्तींनी दरोडा टाकून एक लाख 20 हजार रु.रोख रकमेसह तीन लाख 33 हजार पाचशे रुपयांच्या सोन्याची चोरी केली आहे. घटनास्थळाला अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी भेट देऊन पाहणी केली.


सविस्तर माहिती अशी की, नागनाथ नरसाळे यांनी पुतणे रवींद्र नरसाळे यांच्याकडून ऊस तोड कामगारांच्या टोळीला देण्यासाठी एक लाख 20 हजार रुपये आणून कपाटात ठेवले होते. काल (गुरुवार) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घराचा दरवाजा पुढे करून सर्वजण झोपले होते. त्यावेळी नागनाथ नरसाळे हे झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास नरसाळे यांना दोन अनोळखी व्यक्तींनी झोपेतून उठवून त्यांच्या हातातील चाकूचा धाक दाखवून तू ओरडलास तर तुला खलास करून टाकेन असे म्हणत छातीला चाकू लावला. त्याचवेळी एक अनोळखी व्यक्ती दरवाजाबाहेर उभा होता तर चार चोरटे बेडरूम मध्ये होते व एका चोरट्याने नागनाथ यांच्या मुलाला धरून नागनाथकडे आणले व दोघांना किचन मध्ये नेले.

बेडरूम मध्ये असलेल्या चोरट्यांनी नागनाथ यांच्या पत्नीला व सुनेला चाकूचा धाक दाखवत 80 हजार रुपयांचे चार तोळ्याचे घंटन, 20 हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे घंटन,10 हजार रुपये किमतीचे अर्धा तोळ्याचे मणिमंगळसूत्र, सहा हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅमचे कानातील फुले, 10 हजार रुपये किमतीची अर्धा तोळा सोन्याची चैन, चार हजार रुपये किमतीच्या दोन ग्रॅम सोन्याच्या तीन अंगठ्या व एक बदाम, एक हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या मनगट्या,20 हजार किमतीची एक तोळे सोन्याची बोरमाळ, 20 हजार किमतीची एक तोळे सोन्याचे घंटन, 20 हजार किमतीची एक तोळे सोन्याचे फुले,झुबे व वेल, अडीच हजार रुपये किमतीचे चांदीचे चार करदूडे, चार पैंजण व दोन बिंदल्या, 20 हजार रुपये किमतीचा सॅमसंग एल.ई.डी. टीव्ही, तसेच रोख रक्कम एक लाख 20 हजार रुपये असे एकूण तीन लाख 33 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.


घटनास्थळाला अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे यांनी भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊन तपासाबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, श्वान पथक,फिंगरप्रिंट पथक घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत करकंब पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक प्रशांत पाटील करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!