पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे ज्वेलर्स वर दरोडा
टीम : ईगल आय मीडिया
पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बोईसर बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दुकानाची भिंत व लॉकर तोडून दरोडेखोरांनी १४ किलो सोने व ६० लाख रुपयांची रोख रक्कम असे एकूण सात कोटी साठ लाखांचा ऐवज चोरून नेला. या दरोड्यामुळे पालघर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
बोईसर-तारापूर या राज्य मार्गावरील चित्रालय या व्यापारी पेठेतील साई शॉपिंग सेंटरमध्ये श्रीरंग पाटील यांच्या मालकीचे मंगलम ज्वेलर्स हे दुमजली दुकान आहे. त्या दुकानालगत असलेल्या पहिल्या मजल्यावरील क्लासच्या शटरचे कुलूप दारोदेखोरांनी प्रथम तोडले. क्लासेस व ज्वेलर्सच्या दुकानामधील भिंत गोलाकार कापून त्यामधून ऑक्सिजन व एलपीजी अशी दोन गॅस सिलिंडर आत नेली.
घटनास्थळी पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, बोईसर विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी विश्वास वळवी, बोईसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी भेट दिली. तर श्वानपथक व फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे. आम्ही लवकरात लवकर मुद्देमालासह दरोदेखोरांना पकडू, असे बोईसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी सांगितले.
गॅस कटरने लॉकर कापून दरोडा टाकून पोबारा केल्याची घटना घडली. मंगळवार मध्यरात्री २.३० वाजता दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज असून दरोडेखोरांनी प्रथम सर्व सायरनचे व सीसीटीव्हीचे कनेक्शन तोडून नंतर लूट केली. सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये ८ ते ९ जण दिसत आहेत. भर वस्तीत दरोडा पडल्याने बोईसरसह जिल्ह्यातील सुवर्णाकार दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.