मंगळवेढा तालुक्यातील दुर्घटना : वाहन चालक पसार
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
मंगळवेढा पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल गणेश प्रभू सोनलकर हे शिरसी – गोणेवाडी रोड वर शिरसी हद्दीत थांबले असता बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पो ने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज ( शनिवारी ) सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून अज्ञात टेम्पो चालक त्याचा साथीदार व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोनलकर हे शिरसी येथे हॅटसन डेअरी जवळ त्यांच्या कामाच्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला स्वतःच्या दुचाकीवर थांबले होते. याच रस्त्याने पांढऱ्या रंगाची बिगर नंबरची इंटरा व्ही तीस ही टाटा कंपनीची गाडी शासनाची वाळू चोरून बेकायदेशीररित्या वाहनात भरून जात असताना सोनलकर यांच्या लक्षात आले. या वाहनाला थांबण्याचा इशारा केला मात्र वाहनावर कारवाई होईल या भीतीपोटी वाहन चालक त्याचा साथीदार यांनी वाळूने भरलेले वाहन कॉन्स्टेबल सोनलकर त्यांच्या अंगावर घातले आणि त्यांना ठार मारले. यानंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे.
या घटनेची या घटनेची फिर्याद गोणेवाडीचे पोलीस – पाटील संजय मेटकरी यांनी दिली आहे. माहिती समजताच पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक विभागीय अधिकारी राजश्री पाटील यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.