2 महिलांसह एका पुरुषाला अटक
पंढरपूर : ईगल आय मीडिया
उचेठाण ( ता.मंगळवेढा ) येथील दामाजी सहकारी साखर कारखाना चौकात चालत असलेल्या वेश्या व्यवसायावर धाड टाकून शरीर विक्री करणाऱ्या महिलेस तिला या व्यवसायासाठी वापरणाऱ्या आणखी एका महिलेस आणि पंढरपूर येथून आलेल्या एका पुरुष ग्राहकास अटक केली आहे. ही कारवाई गुरुवार ( दि. 25 मार्च ) रोजी रात्री उशिरा करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दामाजी सहकारी साखर कारखाना चौकात उचेठाण गावच्या हद्दीत अनधिकृत पणे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मंगळवेढा पोलिसांना गुप्त वार्ता विभागाकडून समजली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून सदर ठिकाणी पाठवले. बनावट ग्राहकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री होताच पोलिसांना संदेश दिला आणि पोलीस पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली.
यावेळी मंगळवेढा येथील रहिवासी असलेली एक महिला, औरंगाबाद येथील शरीर विक्री करणारी एक महिला, वेश्या गमनासाठी आलेली पंढरपूर येथील नागालँड चौकातील सुरवसे आडनाव असलेली एक व्यक्ती याना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी रोख 1 लाख 89 हजार रुपयांसह इतर 2 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोन महिला आणि एका पुरुषाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.