मुलीच्या विनयभंगप्रकरणी उपनिरीक्षकास 6 महिने सक्तमजुरी, 10 हजार रुपये दंडाची शिक्षा
पंढरपूर : ईगल आय मीडिया
मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अंबादास यादव याची मंगळवेढा न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा अपीलात पंढरपूर सञ न्यायालयाने कायम केली. सहा महिने सक्तमजुरी व 10 हजार दंड व पिडीत मुलीस 5 हजार नुकसान भरपाईची शिक्षा पंढरपूर चे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एन. के.मोरे यांनी कायम ठेवत आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे अपील फेटाळले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत मुलीस एका तरुणाने पळवून नेले होते. याप्रकरणी मुलीच्या आईने मंगळवेढा पोलीसात तक्रार दिली होती. पोलीसांनी तपास करीत सदर मुलीस अकलूज येथील बसस्थानकातून शोधून पोलीस ठाण्यात आणले. यावेळी महिला पोलीस कर्मचारी निघून गेल्यानंतर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अंबादास यादव याने पोलीस ठाण्यातच मुलीचा विनयभंग केला. मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन घेतला नाही.
यामुळे पिडितेने कोर्टात धाव घेतली. यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी मंगळवेढा येथील ज्यु मॅ वर्ग १ यांनी नियमित फौजदारी खटला ४/१२ ची सुनावणी घेवून आरोपी पोलीस उपनिरीक्षकास शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेविरोधात पंढरपूर न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. या अपीलाची सुनावणी घेवून न्या एन के मोरे यांनी मंगळवेढा न्यायालयाचा निकाल कायम ठेवत अपील फेटाळले. यात सरकार तर्फे अॅड सारंग वांगीकर यांनी काम पाहिले.