ए टी एम मशीनसह लाखो रुपये पळवले

आष्टी ( ता. मोहोळ ) येथील घटना

मोहोळ : ईगल आय मीडिया
आष्टी ( ता.मोहोळ ) येथे एकाच रात्रीत अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने दोन एटीएम फोडून एका एटीएम मशिन सह तब्बल पाच लाख १२ हजाराची रोकड लंपास केली. ही घटना २३ ते २४ नोव्हेंबर दरम्यान मध्यरात्री घडली. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.


या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी गावांमध्ये बँक ऑफ इंडिया आणि टाटा इंडिकॅश कंपनीची दोन वेगवेगळी एटीएम आहेत. सदर एटीएमच्या शेजारी अरविंद भिमराव पाटील यांचे कोल्ड्रिंक्सचे दुकान आहे. दररोज रात्री अकरा वाजता अरविंद पाटील हे एटीएम’चे सेंटर बंद करतात. २३ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता नेहमीप्रमाणे ते एटीएम’ सेंटर बंद करून घरी गेले होते.


२४ नोव्हेंबर रोजी पहाटे पावणे पाच वाजता अरविंद पाटील दुकानाकडे गेले असता, ४ इसम संशयितरित्या फिरत होते. त्यामुळे त्यांना विचारपूस करण्यासाठी जात असताना त्या इसमांनी त्यांना दगड फेकून मारुन जखमी करण्याचा प्रयत्न केला आणि स्विफ्ट कारमधून शेटफळच्या दिशेने पळून गेले. पळून गेलेल्या त्या ४ अज्ञात इसमांनी गावातील टाटा इंडिकॅश कंपनी आणि बँक ऑफ इंडियाच्या एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडून त्यामधील रोख रक्कम चोरुन नेल्याचे काही वेळातच उघडकीस आले.

या चोरट्यांनी ५ लाख ३ हजार चारशे रुपयांच्या रोकडी सह टाटा इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशिन आणि बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मधील ९ हजार रुपये अशी एकुण ५ लाख १२ हजार चारशे रुपयांची रक्कम चोरुन नेली आहे.
या प्रकरणी महेश दत्तु भानवसे यांनी मोहोळ पोलिसात तक्रार दिल्याने ४ अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर हे करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!